देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होताना दिसत आहेत. राज्यात कोरोना रुग्णांसह ओमायक्रॉन रुग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे. राज्यात सोमवारी ३३ हजार ४७० नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर २९ हजार ६७१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. दुसरीकडे ओमायक्रॉन विषाणूचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. राज्यात ३१ ओमायक्रॉन रुग्णांची नोंद झाली असून ओमायक्रॉन रुग्णांची संख्या १ हजार २४७ वर पोहचली आहे तर ४६७ रुग्णांनी ओमायक्रॉनवर मात केली आहे.
राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून राज्यात कोरोना रुग्णांनी ४० हजाराचा टप्पा ओलांडला आहे. तर राज्यात सोमवारी आठ कोरोना रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना मृत्यू दर २.०३ टक्क्यावर पोहचला आहे.
राज्यातील वाढती कोरोना रुग्ण संख्या चिंतेचे कारण ठरत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात नवे निर्बंध लागू करण्यात आले असून नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. तसेच नागरिकांनी लसीकरणावर भर देण्याचे आवाहनही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.
देशभरात कोरोना रुग्णांत वाढ होत असून सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. त्यामुळे या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोरोना लसीकरण आणि कोरोना चाचणी वाढवण्यावर भर देण्याचे राजेश टोपे यांनी सांगितले आहे. तसेच जिल्हा स्तरावर होम आयसोलेशन किट तयार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. राज्यात लावण्यात आलेले निर्बंध हे विचारपूर्वक घेतले असून नागिरकांनी या कोरोना नियमांचे पालन करण्याची विनंती राजेश टोपे यांनी केली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.