1 मे रोजी पुण्यातील नसरापूर येथे चार वर्षीय चिमुरडीवरील अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात संताप आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. याच पार्श्वभूमिवर नसरापूर प्रकरणातील मुख्य आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने 14 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
आज पुण्यातील शिवाजीनगर सत्र न्यायालय येथे भीमराव कांबळे याला हजर करण्यात आलं होतं. आरोपीची ऑनलाइन पद्धतीने सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने पोलिसांविरोधात काही तक्रार आहे का? असा प्रश्न विचारला असता भीमराव कांबळे याने ‘नाही’ असे उत्तर दिले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपीला 14 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
या प्रकरणात अनेक खुलासे समोर येत आहेत. अशातच तपासादरम्यान पोलिसांच्या हाती प्रत्यक्षदर्शी म्हणून ठोस पुरावा सापडला आहे. त्या लहान चिमुकलीवर अत्याचार करतेवेळी त्याला 4-5 मुलांनी अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळेस या क्रूर नराधमाने त्या मुलांवर दगड भिरकावून त्यांना पळवून लावल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे.
यासंदर्भातला सीसीटीवी पोलिसांनी जप्त केला असून त्या प्रत्यक्षदर्शी मुलांची ई-साक्ष देखील नोंदवून घेतली आहे. या प्रकरणी सर्वत्र संतापाची लाट उसळली असून नसरापूर प्रकरणाची सुनावणी प्रभावीपणे आणि जलदगतीने करून आरोपीला लवकरात लवकरत शिक्षा करावी अशी मागणी जोर धरत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.