जिल्ह्यातून वेगवेगळ्या भागातून विविध प्रकारची फुले बाजारात दाखल होत आहे. मागणीही मोठी असल्याने कट फ्लॉवर वगळता सर्व फुलांचे दर गेल्या आठवड्याच्या तुलनेत जवळपास दुपटीने वधारले आहे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात दाखल झालेला झेंडू यंदा महागला आहे. गारपिटीमुळे झेंडूच्या उत्पादनावर परिणाम झाल्याने दादरच्या बाजारपेठेत झेंडूची फुले ८० रुपये किलोने विकली जात आहेत. झेंडूबरोबरच गोंडय़ाच्या तोरणासाठी मीटरमागे ४० रुपये मोजावे लागत आहेत.
हिंदू नववर्षासाठी बाजारात गोंडय़ाच्या फुलांना प्रचंड मागणी असते. यंदा गारपिटीमुळे फुलांचेही ब-याच प्रमाणात नुकसान झाले. गोंडा, अष्टर या फुलांचे उत्पादन घटल्यामुळे यंदा बाजारात फुले महाग झाल्याचे दिसून येत आहे. दादरच्या मार्केटमध्ये पुणे व नाशिक येथून झेंडूंच्या फुलांची आयात होते.
मात्र गारपिटीमुळे झेंडूच्या उत्पादनाला फटका बसल्याचे फुलविक्रेता नामदेवराव यांनीही सांगितले. नववर्षानिमित्त खरेदीसाठी दादरच्या बाजारपेठेत गर्दी वाढली आहे. मात्र फुले महागल्याने ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली. वातावरणातील बदलांमुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत गुलछडीची निम्म्याहून कमी आवक होत आहे. सणामुळे मागणी वाढल्याने त्याच्या भावातही वाढ झाली आहे. सणावेळी केसांमध्ये माळण्यासाठी महिलावर्गाकडून गजऱ्याला पसंती मिळते. त्यासाठी लागणाऱ्या मोगरा व कागड्याचे भावही वीस ते तीस टक्क्यांनी वधारले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.