मालेगाव : नुकतेच नसरापूर चिमुकलीच्या अत्याचार आणि हत्येप्रकरणी आरोपी भीमराव कांबळे याला कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. त्यापाठोपाठ आता मालेगावमधील चिमुरडीलाही न्याय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी ॲड. उज्ज्वल निकम यांनी महत्त्वाची माहिती दिली असून लवकरच या प्रकरणाचा निकाल लागेल, अशी आशा व्यक्त होत आहे. राज्याला हादरवून सोडणाऱ्या मालेगावच्या डोंगरगाव येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व हत्या प्रकरणाची आज, गुरुवारी सुनावणी पूर्ण झाली असून खटल्यातील सर्व साक्षीदारांच्या साक्षी नोंदवून झाल्या असून पुराव्यांचे कामही पूर्ण झाले आहे. आरोपीच्या जबाबासाठी न्यायालयाने 18 जुलै तारीख निश्चित केली आहे. खटल्याचा अंतिम युक्तिवाद होईल, अशी माहिती या खटल्यासाठी शासनाच्या वतीने नियुक्त करण्यात आलेले विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम यांनी दिली. ॲड. उज्ज्वल निकम आज खटल्याच्या सुनावणीसाठी मालेगाव न्यायालयात हजर होते. यावेळी माध्यमांशी बोलतांना निकम म्हणाले की, खटल्यात कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नाही. पीडित मुलीसोबत असलेल्या मुलींच्या साक्षीवर हा खटला आधारित आहे. पोलिसांनी या खटल्यात रासानिक तज्ज्ञांचा अहवाल आणि परिस्थितीजन्य पुरावे न्यायालयात सादर केले आहेत. परिस्थितीजन्य पुराव्यांची साखळी आणि न्यायालयाने साक्षीदारांवर ठेवलेला विश्वास यावर सविस्तर विवेचन केले जाईल. प्रकरणाचा निकाल लवकर लागेल अशीही अपेक्षा ॲड. उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा : Maharashtra TET Scam: TET घोटाळ्याचे धागेदोरे थेट बिहार-हरियाणात; आणखी 3 आरोपींना बेड्या
काय आहे प्रकरण
मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात नोव्हेंबर 2025 मध्ये एका चार वर्षाच्या चिमुरडीवर पाशवी अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर मालेगावसह संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणी पोलिसांनी विजय खैरनार (वय 24) या संशयित आरोपीला तातडीने अटक केली होती. आरोपी आणि पीडितेच्या वडिलांमध्ये झालेल्या पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून त्याने हे कृत्य केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले होते. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. डोंगराळे परिसरासह मालेगावमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला होता. तसेच आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत नागरिकांनी मोठे मोर्चे काढले होते. तर या घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन हे प्रकरण जलदगती न्यायालयात (Fast Track Court) चालवून आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी, यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून ॲड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली होती.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.