राज्यासह देशभरात आज महाशिवरात्रीचा उत्साह आहे. राज्यातील ज्योतिर्लिंग देवस्थानांवर भाविकांनी दर्शनासाठी पहाटेपासूनच गर्दी केली आहे. गेली तीन वर्षे कोरोनामुळे मंदिरे बंद होती. यंदा थेट दर्शन घेता येत असल्याने भाविकांमध्ये उत्साह दिसत असून पहाटेपासूनच भाविकांनी मंदिरांमध्ये गर्दी केली. माघ महिन्यातील एकादशी आणि महाशिवरात्री निमित्ताने जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावातील संत मुक्ताई समाधी स्थळी मोठी यात्रा भरत असते. या यात्रेच्या निमित्ताने चांगदेव आणि कोथळी या दोन्ही ठिकाणी लाखो भाविकांनी दर्शन घेण्यासाठी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे. माघ वारी एकादशी आणि महाशिवरात्री निमित्ताने संत मुक्ताबाईंच्या पादुकांची चांगदेव महाराज मंदिर येथे पालखी काढण्याची सातशे तीस वर्षांची अखंड परंपरा आहे.
देशातील आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ येथे महाशिवरात्री निमित्त आज पासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. हजारो भाविक दर्शनासाठी दाखल झाले आहेत. हर हर महादेवाच्या जयघोषणाने नागनाथ नगरी दुमदुमली आहे. देशातील बारा ज्योतिर्लिंगपैकी शेवटचे ज्योतिर्लिंग म्हणून औरंगाबादमधील वेरुळ येथील घृष्णेश्वर महादेव मंदिराची ओळख आहे. त्यामुळे याठिकाणी भाविकांची मोठी गर्दी आहे. मराठवाड्यासह देशभरातील भाविक याठिकाणी दर्शनासाठी रात्रीपासून वेरुळमध्ये दाखल होत आहे. शनिवारी वेरूळसाठी औरंगाबाद शहरातून 30 सिटी बस सोडण्यात येतील.
महाशिवरात्रीच्या निमित्ताने देशातील पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या परळीतल्या वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या मंदिरात पहाटेपासून भाविकांची मोठी गर्दी आहे. महाशिवरात्रीला दर्शन घेण्यासाठी राज्यभरातून आणि राज्या बाहेरुन सुद्धा भाविक परळीमध्ये येत आहेत. रात्रीपासूनच दर्शनासाठी लोक रांगेमध्ये लागले आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.