राज्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. पावसाचा जोर इतका प्रचंड आहे की शहरात अनेक ठिकाणी झाड कोसळण्याच्या गंभीर घटना समोर येत आहेत. अशातच मुंबईतील चेंबूर परिसरातील 11 नंबर रोडवर एका धावत्या शाळकरी मुलांच्या बसवर अचानक एक भलंमोठं झालं कोसळल्यामुळे मोठी दुर्घटना झाली आहे. यावेळी झाडाच्या मोठ्या फांद्या आणि बुंधा थेट बसच्या छतावर आदळल्याने वाहनाचा पुढील आणि मधला भाग मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झाला. त्यामध्ये एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर 10 विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
अपघात होताच बसमधून विद्यार्थ्यांच्या आरडाओरडाचा आवाज येऊ लागला. परिसरातील नागरिकांनी क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी धाव घेतली आणि बसमधील मुलांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू केला. त्याचवेळी पोलिसांना आणि अग्निशमन दलाला घटनेची माहिती देण्यात आली. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चेंबूर घटनेची माहिती महापालिका आयुक्त अश्विनी भिडे आणि महापौर रितू तावडे यांच्याकडून घेतली आहे. या घटनेतील जखमी मुलांची प्रकृती सध्या धोक्याबाहेर असून जखमी मुलांना उपचारासाठी आवश्यक ती सर्व मदत करण्याचे निर्देश फडणवीसांनी दिले आहेत. संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
तसेच अपघातादरम्यान रुग्णालयात उपचार घेत असलेल्या विद्यार्थ्यांचा खर्च हा प्रशासनाकडून करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या दुर्घटनेमध्ये ज्याचा मृत्यू झाला आहे त्यांच्या कुटुंबियाला मदत केली जाणार आहे. पावसाळ्यात जुनी आणि धोकादायक झाडे वेळेत छाटली जात नसल्याचा मुद्दाही पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त करत शहरातील धोकादायक झाडांची तातडीने तपासणी करून आवश्यक ती कारवाई करण्याची मागणी केली आहे. यावर दादा भुसे यांनी म्हटलं की, रस्त्या लगत असलेल्या झाडांमुळे अशा घटना वारंवार या घडत असल्यामुळे त्याचा एक ड्राईव्ह घेतला पाहिजे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.