ठाणे: मुंबई आणि ठाणे या शहरांमधील वाहतूक कोंडीतून लवकरच सुटका होणार आहे. ठाणेकरांचे मेट्रोचे स्वप्न आता सत्यात उतरण्याच्या अगदी जवळ आले असून, 2026 हे वर्ष प्रवाशांसाठी खऱ्या अर्थाने 'गतिमान' ठरणार आहे. कासारवडवली, विक्रोळी ते थेट वडाळा असा प्रवास सुकर करणाऱ्या मेट्रो लाईन 4 आणि 4A बाबत राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी महत्त्वाची अपडेट दिली आहे. तासन् तास ट्रॅफिकमध्ये अडकणाऱ्या चाकरमान्यांसाठी ही बातमी मोठा दिलासा देणारी ठरणार आहे.
ठाण्यात आयोजित एका विशेष पत्रकार परिषदेत बोलताना प्रताप सरनाईक यांनी मेट्रो प्रकल्पाच्या सद्यस्थितीवर प्रकाश टाकला. त्यांच्या माहितीनुसार, मेट्रो लाईन 4 आणि 4A चा सुमारे दोन-तृतीयांश भाग 2026 मध्ये प्रवाशांसाठी खुला केला जाणार आहे. महापालिका निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे कामाच्या वेगात काहीसा अडथळा आला असला, तरी आता युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हा प्रकल्प टप्प्याटप्प्याने कार्यान्वित होणार असून त्याचा पहिला फायदा ठाणेकरांना मिळणार आहे.
या मेट्रो मार्गिकेचा सर्वात पहिला टप्पा हा ठाण्यातील अंतर्गत प्रवासासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कॅडबरी जंक्शन ते गायमुखपर्यंतचा 10.5 किलोमीटरचा मार्ग मार्च 2026 पर्यंत सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यामध्ये कासारवडवली ते गायमुख या 2.7 किमी लांबीच्या मेट्रो 4A विस्ताराचाही समावेश असेल. या टप्प्यामुळे घोडबंदर रोडवरील वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.
पहिला टप्पा यशस्वीपणे सुरू झाल्यानंतर पुढील सहा महिन्यांत गायमुख ते विक्रोळीतील गांधी नगरपर्यंतचा 10 किलोमीटरचा दुसरा टप्पा पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. ही मेट्रो मार्गिका अखेरीस वडाळ्यापर्यंत पोहोचणार असून, संपूर्ण प्रकल्प 2027 पर्यंत पूर्णत्वास येईल. अशाप्रकारे टप्प्याटप्प्याने ही सेवा सुरू झाल्यामुळे प्रवाशांना हळूहळू संपूर्ण मार्गावर प्रवास करता येईल.
ओवळा-माजिवाडा विधानसभा मतदारसंघातील विकासकामांचा कार्यअहवाल प्रकाशित करताना सरनाईक यांनी आपल्या कामगिरीचा पाढा वाचला. "आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालत विकासाची वाटचाल करत आहोत," असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. निवडणुकीच्या तोंडावर मेट्रोची ही घोषणा ठाणे आणि मुंबईतील मतदारांसाठी महत्त्वाची मानली जात आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.