शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचं औचित्य साधून शिवसेनेनं सोमवारी मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यातून उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपवर टीका केली. भाजपवाल्यांसाठी मुंबई ही सोन्याचं अंडं देणारी कोंबडी आहे आणि ते ती कापायला निघालेत, आम्ही ते कदापि होऊ देणार नाही, असा आवाज उद्धव ठाकरे यांनी सोमवारी दिला आहे. दरम्यान, यावरून भाजपा नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. उद्धव ठाकरेंनी मुंबई महापालिका शेठजींसारखी चालवली, असं ते म्हणाले. मुंबईत माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
‘मी शेठजी यासाठी म्हणतो, कारण त्यांनी धनडांगग्या शेठजींसाठी काम केले. त्यांनी बिल्डर, ठेकेदार, डिस्को, पब, बार या सर्वांना सुट दिली. मनपाच्या ठेवींबाबत बोलताना तेच म्हणाले की, हे ठेकेदारांचे पैसे आहेत. आजही ठेकेदारांचे पैसे परत देण्यासाठी शेठजी उद्धव ठाकरे लक्ष देतात. त्यामुळे त्यांच्या पक्षाने टाकलेल्या दरोड्यांपासून मुंबई महापालिका वाचवणे महत्त्वाचे असून भाजप मुंबईकरांबरोबर आहे.’ असे ते म्हणाले.
‘उद्धव ठाकरे एक अपयशी नेता आहेत. उद्धव ठाकरेंचे चुलत बंधू त्यांच्यापासून दूर झाले. त्यांच्या पक्षातील नेत्यांनीसुद्धा त्यांना नाकारले. त्यामुळे कौटुंबिक आणि राजकीय पातळीवर ते अपयशी ठरले आहेत. अशा अपयशी व्यक्तीच्या बोलण्याला किती महत्त्व द्यायचे, याचा विचार करावा. गेल्या २५ वर्षांत या दरोडेखोरांनी २२ हजार कोटी स्वत:च्या खिशातून खर्च केले का? त्यांनी मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पावर दरोडा टाकला आणि मुंबईकरांना सेवासुद्धा दिल्या नाहीत.’ असे ते म्हणाले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.