अमेरिकेच्या हिंडनबर्ग अहवालामुळे भारतात राजकीय भूकंप आला. हिंडनबर्गच्या अहवालानुसार, अदानी समुहावर आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप करण्यात आला. या अहवालानंतर अदानी समुहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आणि गौतम अदानी चर्चेचा विषय ठरले. याचे पडसाद संसदेतही उमटले असून विरोधकांनी याप्रकरणी जेपीसीची मागणी केली. दरम्यान, याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हिंडनबर्गच्या अहवालाला इतके महत्त्व का दिलं जातंय?, असा सवाल शरद पवार यांनी उपस्थित केला आहे. हिंडनबर्गच्या अहवालातून अदानी समुहाला टार्गेट केलं जात असल्याचं शरद पवार म्हणाले. अदानी समुहाने चुकीचे केले असल्यास त्याची चौकशी झालीच पाहिजे. मात्र, यावेळी अदानी प्रकरणाला जास्त महत्त्व दिले गेले.
अदानी प्रकरणाची जेपीसी चौकशी करण्याची मागणी काँग्रेससह विरोधी पक्षनेत्यांनी केली. यावर शरद पवार म्हणाले, महाराष्ट्रात उद्धव गट, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षाची युती आहे. मात्र, आम्ही काँग्रेसच्या विचारांशी सहमत नाही. जेपीसी चौकशी देखरेख ही सत्ताधारी पक्षांतर्गतच होईल आणि बहुमत हे सत्ताधारी पक्षाकडे आहे. त्यामुळे जेपीसी चौकशीतून सत्य बाहेर पडणार नाही. म्हणून सर्वोच्च न्यायालयाने अदानी प्रकरणात तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यास सांगितले. त्यामुळे जेपीसीपेक्षा सर्वोच्च न्यायालयाची समिती अधिक उपयुक्त असल्याचे शरद पवार म्हणाले. या समितीमुळे प्रकरणाचा उलगडा होण्याची दाट शक्यता आहे. म्हणून अदानी प्रकरणातील गैरव्यवहार बाहेर काढण्यासाठी जेपीसीची गरज नाही, असे पवार म्हणाले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.