लग्नाचा सीझन सुरु झाल्यामुळे ठिकठिकाणी प्री-वेडिंग शूटचा प्रकार पाहायला मिळत आहे. मात्र हे प्री-वेडिंग शूट आता वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचे देखील चित्र समोर उभं राहिलं आहे. काही दिवसांपूर्वी रायगड जिल्ह्यातील दिवेआगर येथील रुपनारायण मंदीरात प्रीवेडींग शूट केल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रीवेडींग शूट वरून तेथील स्थानिक लोक आणि मंदीर व्यवस्थापन यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. हा प्रकार सुरु असतानाच आता किल्ले रायगडावर प्री-वेडिंग शूट केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवसमाधीस्थळाजवळ शूट केल्याचा आरोप होत असून या घटनेमुळे शिवप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. रायगड हा केवळ ऐतिहासिक किल्ला नसून तो महाराष्ट्राच्या अस्मितेचं प्रतीक मानला जातो. येथे असलेली शिवसमाधी ही श्रद्धेचं केंद्र आहे. अशा पवित्र स्थळी प्री-वेडिंग शूटसारख्या कार्यक्रमांचं आयोजन केल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. यानंतर आता राष्ट्रवादी अजित पवार पक्षातील नेते आणि रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी यावर ही गोष्ट अत्यंत निंदनीय असल्याची म्हणत प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा- Raigad Fort Controversy: ‘जिथे हजारो मावळ्यांचं रक्त सांडलं…’; रायगडावरील ‘तो’ व्हिडिओ व्हायरल, शिवभक्तांमध्ये संतापाची लाट; नेमकं काय घडलं?
यावेळी सुनील तटकरे म्हणाले की, “कुठल्याही परिस्थितीत छत्रपती शिवरायांची राजधानी हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्याचं ऐतिहासिक महत्त्व टिकवण्याची जबाबदारी प्रत्येक भारतीय नागरिकांची सुद्धा आहे. जे विदेशी पर्यटक येतील इतिहासकालीन खुणा बघण्यासाठी त्यांची सुद्धा जबाबदारी त्या पद्धतीने राहील. पण भारतीय पुरातत्व खात्याला सुद्धा आमच्याकडूना सूचना त्या ठिकाणी स्पष्टपणाने दिल्या जातील अशा प्रकारचं प्री-वेडिंग शूट ज्यांनी केलं असेल त्यांच्यावरसुद्धा कारवाई झाली पाहिजे कारण तिथलं पावित्र्य ज्या पद्धतीने नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ती बाब अत्यंत निंदनीय आहे. पण समाज मनाला सुद्धा माझी विनंती आहे. त्या ऐतिहासिक वास्तूच पावित्र्य जतन प्रत्येक शिवप्रेमी नागरिकांनी पुढच्या कालावधीमध्ये घेतली पाहिजे अशी एक शिवप्रेमी म्हणून माझी स्वतःची भावना आहे.”
शिवसेना एकनाथ शिंदे पक्षातील नेते मंत्री भरत गोगावले देखील रायगडमधील शिवसमाधीवरील प्रि-वेडिंग शूट प्रकरणावरून आक्रमक झाले आहेत. महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या गडकिल्ल्यांवर प्रि-वेडिंग शूटसारख्या प्रकारांना अजिबात स्थान नाही, अशी कडक भूमिका मंत्री भरत गोगावले यांनी घेतली आहे. किल्ले रायगडावरील शिवसमाधी स्थळाचे पावित्र्य राखले गेलेच पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. अशा प्रकारच्या शूटिंगवर शासनाने तात्काळ बंदी घालावी आणि संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. तसेच, त्या वेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिस गार्ड आणि सिक्युरिटी गार्ड यांच्यावरही जबाबदारी निश्चित करत त्यांच्या बदलीची कारवाई केली जाईल, असा इशाराही मंत्री गोगावले यांनी दिला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.