डोंबिवली , २४ मे २०२३ , प्रतिनिधी : डोंबिवली येथील मानपाडा परिसरात अनधिकृत वीज जोडणी विरोधात महावितरणच्या पथकाने कारवाई केली. या वेळी कारवाईसाठी गेलेल्या महावितरणच्या पथकावर दगडफेक करत त्यांना मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे.
बुधवार २३ मे रोजी दुपारच्या सुमारास डोंबिवली जवळील खोनी गावात बेकायदेशीर वीज जोडण्या व वीज चोरी विरोधात कारवाई करण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या भरारी पथकावर जमावाकडून हल्ला करण्यात आला.
महावितरण मंडळाने बेकायदेशीर विज जोडण्या, मीटरमध्ये फेरफार करत वीजचोरी पकडण्यासाठी भरारी पथकाची नेमणूक केली आहे. खोनी गावात एका बंगल्यातील वीज मीटरवर कारवाई सुरू असतानाच अचानक काहीजण आले व त्यांनी या पथकाचे हुज्जत घालण्यास सुरुवात केली आणि हुज्जतीचे रूपांतर पुढे हाणामारीत होऊन जमावाने लाकडी दांडुक्यांसह दगडाने मारहाण केली. भरारी पथकाच्या गाडीचे देखील या जमावाने भारी नुकसान केले. हा जमाव इथेच थांबला नाही तर भरारी पथकाच्या ताब्यात असलेले मीटर देखील या जमावाने हिसकावून नेले.
या कारवाईसाठी गेलेल्या महावितरणच्या भरारी पथकामधील अभियंत्यांसह, कर्मचारी, पोलीस कर्मचाऱ्यांना देखील यावेळी मारहाण झाली. याप्रकरणात मानपाडा पोलीस चौकीत तक्रार नोंदवली असून पोलीस पुढील कारवाई करत मारेकऱ्यांचा तपस करत आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.