जालन्यात दगडफेक, ४५ पोलीस जखमी

जालन्यात दगडफेक, ४५ पोलीस जखमी

जालना, २ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी चार दिवसांपासून उपोषण करत असलेल्या आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीमार केला. दगडफेकीत तीस पुरुष आणि पंधरा महिला असे ४५ पोलीस अधिकारी – कर्मचारी जखमी झाले.

मराठा मार्चा समन्वयक मनोज जरांगे यांच्यासह दहाजण २९ ऑगस्टपासून आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाला बसले होते. उपोषण करत असलेल्यांना वैद्यकीय तपासणीसाठी पोलीस घेऊन जात होते. यावेळी आरक्षण समर्थक आणि पोलीस यांच्यात वाद झाला. मनोज जरांगे यांच्या समर्थकांकडून पोलिसांना विरोध झाला. काही जणांनी दगडफेक केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. यानंतर परिस्थिती चिघळत गेली.

जालन्यात घडलेल्या घटनेनंतर राज्यात ठिकठिकाणी हिंसक घटना घडल्या आहेत. पोलिसांचा निषेध करण्यासाठी जमावाने जाळपोळ करण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तसेच जालना पोलिसांनी नागरिकांना शांत राहण्याचे आणि कायदा-सुव्यवस्थेचे पालन करण्याचे आवाहन केले.

आज बीड बंद

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी चार दिवसांपासून उपोषण करत असलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केला. या घटनेचा निषेध म्हणून मराठा आरक्षणाच्या समर्थकांनी आज बीड जिल्ह्यात बंदची हाक दिली आहे.

हिंगोलीत सोमवारी बंद

जालना जिल्ह्यात मराठा आरक्षण समर्थकांवर पोलिसांनी लाठीमार केला. या घटनेचा निषेध करण्यासाठी हिंगोली जिल्ह्यात सोमवार ४ सप्टेंबर रोजी बंदची हाक देण्यात आली आहे. सकाळी दहा वाजल्यापासून बंद सुरू होईल. संध्याकाळपर्यंत हे आंदोलन केले जाईल.

‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम पुढे ढकलला

जालना जिल्ह्यातील ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम तिसऱ्यांदा पुढे ढकलण्यात आला. याआधी दोनवेळा कार्यक्रमाची तारीख आणि वेल बदलण्यात आली होती.

मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन

मराठा क्रांती मोर्चाला जालना येथे गालबोट लागले. पोलिसांकडून झालेल्या लाठीमाराविरोधात मावळच्या तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. तसेच मराठा क्रांती मोर्चा युवकांकडून जुना मुंबई – पुणे महामार्गावर आंदोलन करण्यात आले. मात्र पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे जुना पुणे मुंबई महामार्ग ठप्प झाला होता. यावेळी आंदोलनकर्त्यांना बाजूला घेत महामार्ग मोकळा करण्यात आला. यावेळी मराठा आंदोलनकर्त्यांनी सोमवारी मावळ बंदची हाक दिली आहे.

रोह्यात मराठा बांधवांची निदर्शने

जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्याचा रायगड जिल्ह्यात मराठा बांधवांनी ठिकठिकाणी निषेध केला. रोह्यात मराठा बांधवांनी एकत्र येत निषेध केला. यावेळी काळे झेंडे फडकावून आपल्या भावना व्यक्त केल्या.

इस्लामपुरात रास्ता रोको

जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्याचा इस्लामपुरात राष्ट्रवादीने निषेध केला. यावेळी रास्ता रोको करण्यात आला. दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

सोलापूमध्ये घोषणाबाजी

जालना येथील मराठा समाजाच्या नेत्यांवर आणि कार्यकर्त्यांवर पोलिसांनी जो लाठीचार्ज केला त्याविरुद्ध सोलापूरातील छत्रपती शिवाजी चौकात मराठा बांधवांनी एकत्र येऊन निषेध नोंदवला… येणाऱ्या दिवसात मराठा समाजाला पन्नास टक्के आरक्षण नाही दिले गेले, तर येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मराठा समाज सत्ताधाऱ्यांना मतदान करणार नाही असा सज्जड इशारा यावेळी देण्यात आला…

परभणीत रास्ता रोको

परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा समाजातील विविध संघटनेच्या वतीने शुक्रवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं… यावेळी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला होता… तर मराठा समाजाच्या वतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली… एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी करण्यात आली… रस्ता रोको झाल्यानंतर आंदोलकांना मोंढा पोलिसांनी ताब्यात घेतलं…

जालना घटनेचे बुलढाण्यात पडसाद

जालना घटनेचे बुलढाण्यात पडसाद उमटले. बुलढाण्यातून मराठवाड्यात जाणाऱ्या सर्व एसटी रद्द करण्यात आल्या. मोठ्या संख्येने एसटी रद्द झाल्यानं प्रवासी बस स्थानकांवर खोळंबले आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version