जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’ नाटक बंद करण्याची धमकी देण्यात आली आहे. नाटकाच्या कलाकारांना धमकी देण्यात आली आहे. नाटक बंद करा नाहीतर बॉम्बस्फोट घडवीन अशा प्रकारची धमकी अज्ञाताकडून देण्यात आली आहे. निर्मात्यांनी यासंबंधी पोलिसांत तसेच महापालिकेकडे देखील तक्रार दाखल केली आहे.
‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’ नाटकातील कलाकारांना पनवेलच्या वासुदेव बळवंत फडके या नाटय़गृहात धमकी देण्यात आली. रविवारी पनवेलमध्ये या नाटकाचा प्रयोग झाला. त्या वेळी प्रेक्षकांना कलाकारांशी संवाद साधायचा होता, त्याचबरोबर काही मान्यवर व्यक्तीही हे नाटक पाहायला आल्या होत्या. पण व्यवस्थापनाने अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठीचे राखीव दालन उघडण्याची परवानगी नाटय़निर्मात्यांना दिली नाही. त्यामुळे या वेळी साऱ्यांना नाटय़गृहाबाहेर नाटकाबाबत संवाद साधावा लागला.
‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’ हे एका वेगळ्या विषयावरील नाटक आहे. जात-पात न मानणारे हे नाटक आहे. या नाटकात कोणताही आक्षेपार्ह भाग नसल्याचे नाटकाचे निर्माते राहुल भंडारे यांनी सांगितले आहे.
‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’ या नाटक काय आहे?
-‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’ हे एका विचारधारेवर आधारित नाटक आहे
-डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित हे नाटक आहे
-या नाटकात भारतातील अठरापगड जातींचा उलगडा केला आहे
-छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले किंवा अन्य महामानवांना देवत्व कसे दिले जाते, यावर हे नाटक भाष्य करते
-हे नाटक सडलेल्या व्यवस्थेला धक्का देत राहते
-जाती-पाती विसरून आपण सारे भारतीय आहोत, याची जाणीव निर्माण करण्याचा प्रयत्न नाटकात करण्यात आला आहे
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.