मुंबई: दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी बोर्ड परीक्षा 2025 साठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना आनंद झाला असून अधिकचा वेळ मिळाल्याने ते अर्ज योग्य प्रकारे भरू शकणार आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या माहितीनुसार परीक्षा अर्ज भरण्याची सुरुवातीची प्रक्रिया 15 सप्टेंबरपासून सुरु झाली होती आणि सुरुवातीला नियमित शुल्कासह अर्ज भरण्याची शेवटची तारीख 6 ऑक्टोबर निश्चित करण्यात आली होती. परंतु, विद्यार्थ्यांच्या अर्ज प्रक्रियेत अडचणी येऊ नये यामुळे ही अंतिम मुदत आता 6 ऑक्टोबर ते 27 ऑक्टोबर दरम्यान वाढवण्यात आली आहे.
दहावी परीक्षा अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार आहे. नियमित विद्यार्थ्यांनी यूडायस प्रणालीतील पेनआयडीचा उपयोग करून आपले अर्ज शाळांमार्फत ऑनलाइन भरावेत. तसेच पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, श्रेणी सुधार योजनेंतर्गत परीक्षा देऊ इच्छिणारे विद्यार्थी आणि तुरळक विषय किंवा आयटीआयमार्फत श्रेयांक हस्तांतरण घेऊन परीक्षा देऊ इच्छिणारे विद्यार्थी देखील आपले अर्ज त्यांच्या संबंधित शाळांमार्फत ऑनलाइन भरतील अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी दिली आहे.
परीक्षा अर्ज भरण्यापूर्वी शाळा खात्यातील शाळेची माहिती, संस्था, मान्यताप्राप्त विषय, शिक्षक इत्यादींची माहिती योग्य प्रकारे भरून मंडळाकडे पाठवणे अनिवार्य आहे. या प्रक्रियेत कोणतीही चूक झाल्यास विद्यार्थ्यांचे अर्ज योग्य पद्धतीने स्वीकारले जाणार नाहीत. त्यामुळे शाळा आणि विद्यार्थी दोघांनीही या प्रक्रियेत काळजी घेणे आवश्यक असल्याचे शाळांना सूचित केले आहे. तसेच शिक्षण मंडळाच्या या निर्णयामुळे अनेक विद्यार्थी आणि पालक यांना अर्ज पूर्ण करण्याची संधी मिळणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक तयारीवर अधिक लक्ष देण्याची संधी मिळेल. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांच्या हितासाठी घेतलेला हा निर्णय दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक असणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.