मुंबई ४ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी: दिग्ज कलाकारांच्या जाण्याने मनोरंजन विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. २ ऑगस्ट २०२३ रोजी कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचं निधन झालं तर ३ ऑगस्ट २०२३ रोजी निसर्गकवी ना. धों. महानोर यांचं निधन झाले .
मराठी मनोरंजन विश्वातले अनेक कलाकार नितीन देसाई आणि ना. धों. महानोर यांच्याबद्दल भावनिक पोस्ट करत आहेत. अशातच अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने देखील सोशल मिडीयावर भावुक पोस्ट लिहीली आहे. सोनाली लिहिते.. कालच्या धक्क्यातून अजून सावरता आलं नाही आणि ही आणखी एक दुःखद बातमी आली…नितीन देसाईंनंतर…ना.धो.महानोर….. असा कसा हा नियतीचा खेळ ठरावा…!
सोनाली पुढे लिहीते.. “माझ्या आयुष्यात ज्यांनी “अजिंठा” आणला असे नितीन देसाई आणि या महाकाव्याचे जनक ना.धों. महानोर आपल्यात नाही, पण त्यांच्या कलाकृतीं अजारामर राहतील. आपल्याला आयुष्यभर उर्जा देत रहातील हे नक्की. नितीन देसाई यांचं असं जाणं जिवाला चटका लावून जाणारं आहे. त्यांचं कामाबद्दल, कलेबद्दलचं प्रेम, वेड हे खूप काही शिकवून गेलं. त्यांचं कला विश्वातलं कार्य हे अभिमानास्पद आहेच आणि ते पुढील अनेक वर्ष कलाकारांना प्रेरणादायी ठरेलच…”
सोनाली शेवटी लिहीते, “पद्मश्री ना.धों. महानोर यांना अजिंठा या चित्रपटाच्या निमित्ताने भेटण्याचा योग आला होता.. त्यांचं “अजिंठा” नामक स्वप्न पडद्यावर साकारण्याचं भाग्य लाभलं. रानकविता खऱ्या अर्थाने ओसाड झाल्या.. घन ओथंबून येती.. हे शब्दांत व्यक्त करणारे ना.धो. महानोर इहलोकीच्या प्रवासाला निघून गेले. रानापासून मनापर्यंत पोहचलेला हा कवी माणूस. “जैत रे जैत” ते “अजिंठा” ची गाणी ऐकताना महानोर सर तुमची आठवण येत राहील..
भावपूर्ण श्रद्धांजली.” अश्या हृदयस्पर्शी शब्दात सोनालीने तिच्या भावना मांडल्या आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.