Smriti- Palash Wedding:भारताची स्टार क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि लोकप्रिय संगीतकार पलाश मुच्छल यांच्या विवाहाची चर्चा गेल्या काही दिवसांत प्रचंड रंगली. सुरुवातीला २३ नोव्हेंबर ही त्यांच्या लग्नाची ठरलेली तारीख होती, आणि देशभरातील क्रिकेटप्रेमींना या सेलिब्रिटी विवाहाची मोठी उत्सुकता होती. अनेक टीम इंडिया खेळाडूही या सोहळ्याला हजेरी लावणार होते. मात्र, अगदी शेवटच्या क्षणी दोन्ही कुटुंबांना धक्कादायक परिस्थितीचा सामना करावा लागला.
लग्नाच्या काही तास आधीच स्मृतीच्या वडिलांची तब्येत अचानक बिघडली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले. मानधना कुटुंबीयांसाठी हा मोठा धक्का होता. घरात लग्नाची धावपळ सुरू असतानाच या गंभीर परिस्थितीमुळे सर्वांची धांदल उडाली. याच तणावाचा परिणाम म्हणून पलाश मुच्छलची तब्येतही बिघडली, आणि त्यालाही काही तासांच्या उपचारांसाठी रुग्णालयात न्यावे लागले. या दोन्ही घटनांमुळे कुटुंबांनी एकमताने विवाह अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. “स्मृतीच्या वडिलांची अवस्था पाहता हा निर्णय घेणे आम्हाला भाग होते,” असे मुच्छल परिवाराने म्हटले होते.
हेही वाचा:Smriti Mandhana: लग्नाची अनिश्चितता… पण स्मृती मानधनाच्या मैदानात परतण्याची तारीख ठरली
दरम्यान, चाहत्यांमध्ये आणि सोशल मीडियावर “आता लग्न कधी होणार?” याबाबत मोठी चर्चा सुरु झाली. त्यावर आता पलाशची आई अमिता मुच्छल यांनी दिलेल्या मुलाखतीतून थोडी स्पष्टता आली आहे. त्या म्हणाल्या, “स्मृतीचे वडील पलाशसाठी वडिलांसारखेच आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीत सुधार येणं आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचं होतं. आता त्यांना डिस्चार्ज मिळाल्यामुळे आम्ही लग्नाविषयी अधिक सकारात्मक आहोत. सगळी तयारी पुन्हा सुरु होईल. लग्न लवकरच होणार आहे, हे आम्ही निश्चित सांगू शकतो.” अर्थात, लग्नाची नवी तारीख, स्थळ किंवा वेळाविषयी अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही, पण दोन्ही कुटुंबीयांचा सूर मात्र आशादायी आहे.
या संपूर्ण प्रकरणात आणखी एक गोष्ट विशेष म्हणजे स्मृतीची जवळची मैत्रीण आणि भारतीय संघातील अष्टपैलू फलंदाज जेमिमा रॉड्रिग्ज हिचा मोठा निर्णय. स्मृतीच्या लग्नानंतर ती वुमेन्स बिग बॅश लीग खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाला जाणार होती. मात्र, स्मृतीला कठीण काळात आधार देण्यासाठी तिने थेट स्पर्धेतून माघार घेतली. तिच्या या पावलाचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.