जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
केंद्र सरकारने गायी-म्हशींसह अनेक प्राण्यांना कत्तलींसाठी म्हणून गुरांच्या बाजारात विकता येणार नाही, असा नवा नियम केला आहे. या नियमामुळे गरीब शेतकऱ्यांना झळ पोहोचणार असून, कत्तलखाना उद्योगालाही फटका बसणार आहे.
नव्या नियमानुसार पशुविक्रीच्या व्यवहारापूर्वी विक्रेता व खरेदीदाराला ‘शेतकरी’ असल्याचे पुरावे सादर करावे लागतील. सन 1960च्या पशुक्रूरता प्रतिबंधक कायद्याखाली हा नवा नियम तयार करण्यात आला आहे. या नियमानुसार गुरांची खरेदी-विक्री आता शेतकऱ्यांपुरती मर्यादित ठेवण्यात आली.
गाय, बैल, सांड, म्हैस, रेडा, कालवड, बछडे आणि ऊंट यांचा त्यांच्यात समावेश आहे. भाकड गायी आणि वृद्ध बैलांची विक्री करून शेतकरी काही पैसे गाठीशी बांधतात. या कायद्यामुळे त्यांच्या या उत्पन्नावर गदा येणार आहे.
काय आहे सरकारची नवी नियमावली.
पशुविक्रीच्या व्यवहारापूर्वी विक्रेता – खरेदीदाराला ‘शेतकरी’ असल्याचे पुरावे करावे लागणार सादर
व्यवहाराच्या पाच प्रती तयार करून स्थानिक महसूल कार्यालय, जिल्ह्यातील स्थानिक पशुवैद्य आणि पशुबाजार समितीकडे सादर कराव्या लागतील
विक्रेता आणि खरेदीदाराला स्वतःकडेही ठेवावी लागणार एक-एक प्रत
गुरे आणणाऱ्यांकडून विक्रीसाठी आणलेले प्राणी शेतीसाठी असल्याचं हमीपत्र लिहून घेण्याची बाजार समित्यांना सूचना
आंतरराष्ट्रीय सीमेपासून 50 किमी आणि राज्य सीमेपासून 25 किमी अंतर परिसरात गुरांचा बाजार भरवण्यावर बंदी
गाय, बैल, सांड, म्हैस, रेडा, कालवड, बछडे आणि उंटांची खरेदी-विक्री शेतकऱ्यांपुरती मर्यादित
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.