मुंबई: जर तुम्ही येत्या काही दिवसांत श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेण्याचे नियोजन करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिरात पुढील पाच दिवस एक मोठा बदल होणार आहे. एका विशेष धार्मिक विधीमुळे भक्तांना बाप्पाच्या मुख्य मूर्तीचे दर्शन घेता येणार नाही. नेमकं काय आहे हे कारण आणि मंदिर प्रशासनाने भाविकांसाठी कोणती पर्यायी सोय केली आहे? हे जाणून घेतल्याशिवाय घराबाहेर पडू नका, अन्यथा तुम्हाला दर्शन न घेता परतावे लागू शकते.
मुंबईचे आराध्य दैवत असलेल्या श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरातील मुख्य मूर्तीला ‘सिंदूर लेपन’ करण्यात येणार आहे. मंदिराच्या प्राचीन परंपरेनुसार, ठराविक कालावधीनंतर मूर्तीचे पावित्र्य आणि संवर्धन जपण्यासाठी हा विधी पार पाडला जातो. या प्रक्रियेसाठी बुधवार, 7 जानेवारी ते रविवार, 11 जानेवारी 2026 या 5 दिवसांच्या कालावधीत मुख्य मूर्ती सिंदूर लेपनासाठी झाकलेली असेल. त्यामुळे गाभाऱ्यातून होणारे प्रत्यक्ष दर्शन या काळात पूर्णपणे बंद राहील.
मूर्तीला शेंदूर लावण्याचा हा विधी अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने पार पडणार आहे. 7 जानेवारीच्या पहाटेपासून या कामाला सुरुवात होईल आणि 11 जानेवारीच्या रात्रीपर्यंत ते पूर्ण होईल. या पाच दिवसांत बाप्पाचे रूप लेपनाखाली असल्याने भक्तांना बाप्पाच्या त्या तेजस्वी स्वरूपाचे दर्शन घेता येणार नाही, असे मंदिर न्यासाने आपल्या प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट केले आहे.
मात्र, लांबून येणाऱ्या भाविकांची श्रद्धा आणि गैरसोय लक्षात घेऊन मंदिर न्यासाने एक मधला मार्ग काढला आहे. मुख्य मूर्तीचे दर्शन बंद असले, तरी मंदिराच्या आवारात बाप्पाच्या ‘प्रतिमूर्तीचे’ दर्शन घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे भक्तांना आपला नवस किंवा श्रद्धा अर्पण करण्यासाठी प्रतिमूर्तीपुढे नतमस्तक होता येईल. दर्शनासाठी येणाऱ्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी सुरक्षा व्यवस्थाही तैनात करण्यात आली आहे.
हा 5 दिवसांचा विधी पूर्ण झाल्यानंतर, सोमवार, 12 जानेवारी 2026 रोजी सकाळी श्रींच्या मूर्तीचा प्रोक्षणविधी, नैवेद्य आणि विशेष आरती करण्यात येईल. त्यानंतर दुपारी ठीक एक वाजल्यापासून भाविकांसाठी गाभारा पुन्हा उघडला जाईल. 12 जानेवारीच्या दुपारनंतर भाविक नेहमीप्रमाणे बाप्पाच्या मुख्य मूर्तीचे मनोहर दर्शन घेऊ शकतील, अशी माहिती कार्यकारी अधिकारी वीणा पाटील यांनी दिली आहे.
प्रभादेवी परिसरात होणारी वाहतूक कोंडी आणि भाविकांची संभाव्य गर्दी पाहता, मुंबईकरांनी या बदलाची गांभीर्याने नोंद घ्यावी. शक्य असल्यास या पाच दिवसांत दर्शनासाठी जाणे टाळावे. दर्शनासाठी गेलाच तर प्रतिमूर्तीचे दर्शन घेता येणारच आहे. प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयाला भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहन मंदिर न्यासाकडून करण्यात आले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.