जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
दुबईमध्ये एका लग्न सोहळ्यासाठी श्रीदेवी या बोनी कपूरसह त्यांच्या छोट्या मुलीसोबत गेल्या होत्या. तिथेच श्रीदेवी यांचा तोल गेल्याने त्या बाथटबमध्ये पडल्या आणि बुडून त्यांचा मृत्यू झाला, असे पोस्टमॅार्टम अहवालात म्हटले आहे. सोमवरी दुबई पोलिसांकडून श्रीदेवी यांचं मृत्यू प्रमाणपत्रही कुटुंबीयांकडे सोपवण्यात आले आहे.
दुबई पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार “श्रीदेवी यांच्या शरीरात दारुचे अंश आढळले. त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने नव्हे, तर बाथटबमध्ये बुडून झाला”, असा दावा गल्फ न्यूजने म्हणजेच तेथील वृत्तसंस्थेने केला आहे.
परवा (24 फेब्रुवारी) रात्री संयुक्त अरब अमिरातमधल्या अबुधाबीत प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांचं निधन झालं. वयाच्या अवघ्या 54 व्या वर्षी बाथटबमध्ये तोल गेल्याने त्यांचा मृत्यू झाला आणि आपल्या त्यांनी चाहत्यांना कायमचं पोरकं केलं. भाच्याच्या लग्नासाठी पती बोनी कपूर आणि मुलगी खुशीसोबत श्रीदेवी दुबईमध्ये होत्या.
हिंदी सिनेसृष्टीतील पहिली सुपरस्टार अभिनेत्री
श्रीदेवी यांना बॉलिवूडची पहिली लेडी सुपरस्टार मानलं जातं. श्री अम्मा यंगर अय्यपन म्हणजेच श्रीदेवी यांचा जन्म 13 ऑगस्ट 1963 रोजी झाला. त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्ल्याळम चित्रपटातही अभिनय केला आहे.
वयाच्या चौथ्या वर्षी त्यांनी थुनैवन या तामिळ चित्रपटातून बालकलाकार म्हणून सुरुवात केली. 1971 मध्ये वयाच्या अवघ्या 8 व्या वर्षी त्यांना पुम्बाता या मल्ल्याळम चित्रपटासाठी केरळचा सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा राज्य चित्रपट पुरस्कार मिळाला होता.
1975 मध्ये ज्युली या बॉलिवूडपटातून श्रीदेवींनी बालकलाकार म्हणून पदार्पण केलं. त्या चित्रपटात नायिका लक्ष्मीच्या धाकट्या बहिणीची भूमिका श्रीदेवी यांनी रंगवली होती.
वयाच्या 13 व्या वर्षी मूंद्रू मुदिचू (1976) हा श्रीदेवींनी केलेला तामिळ चित्रपट प्रौढ कलाकार म्हणून पहिला सिनेमा मानला जातो. 1979 मध्ये प्रदर्शित झालेला सोलवा सावन हा श्रीदेवी यांचा पहिला बॉलिवूडपट ठरला.
श्रीदेवींचे गाजलेले चित्रपट:
1983- सदमा
1983- हिम्मतवाला
1986- नगिना
1986- आग और शोला
1986- कर्मा
1986- सुहागन
1987 – औलाद
1987 – मिस्टर इंडिया
1989 – निगाहे (नगिना भाग 2)
1989 – चांदनी
1989 – चालबाज (सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर)
1991 – लम्हे (सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर)
1992 – खुदा गवाह
1993 – रुप की रानी चोरों का राजा
1993 – गुमराह
1993 – चंद्रमुखी
1994 – लाडला
1997 – जुदाई
2004 – सहारा वन चॅनलवर मालिनी अय्यर या दैनंदिन मालिकेतून छोट्या पडद्यावर एन्ट्री
2012 – इंग्लिश विंग्लिश
2017 – मॉम
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.