महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी उष्माघाताने अनेकांचा बळी गेला, असंख्य नागरिक आजारी पडले, ज्येष्ठ निरुपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या लाखों अनुयायांना कार्यक्रमासाठी बोलावले, मात्र त्यांच्यासाठी सावली, अन्न व पाण्याची सोय केली गेली नाही. उष्माघाताचा फटका बसून अनेकांचा जीव गेला, या घटनेला शिंदे-फडणवीस सरकार जबाबदार आहे, त्यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ नेते माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
संगमनेर येथे आमदार थोरात यांनी पत्रकार परिषदेतून संवाद साधला. त्यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर ताशेरेही ओढले. ज्येष्ठ निरुपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना मानणारा मोठा वर्ग आहे. या कार्यक्रमाला मोठी उपस्थिती राहील हे माहीत होते. कार्यक्रमासाठी 13 कोटी रुपये खर्च करण्याची तयारी केली होती. मात्र केवळ महत्त्वाच्या व्यक्तींसाठी शाही तंबू व खानपाणाची व्यवस्था करण्यात आली.
खारघर घटनेत मृतांचा आकडा मोठा असण्याची शंका माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे. कार्यक्रमासाठी कोट्यावधी रूपये खर्च करण्यात आले. मग बसण्यासाठी सावलीची व्यवस्था का केली नाही. मृतांच्या पोटात अन्न आणी पाणी नव्हतं. या घटनेला महाराष्ट्र सरकार जबाबदार आहे. याची जबाबदारी स्विकारून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. या घटनेच्या चर्चेसाठी दोन दिवसाचे अधिवेशन बोलावण्यात यावे, अशा मागण्या काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केल्या आहेत.
इतक्या उन्हा तान्हात माणसं बोलवायची होती तर त्यांच्या अन्न पाण्याची सोय का केली गेली नाही? दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या काहीजणांच्या शवविच्छेदनातून त्यांच्या पोटात अनेक तासांत अन्न व पाण्याचा एक कणही गेला नसल्याचे पुढे आल्याचा दावाही त्यांनी केला. या घटनेतून सरकारची निष्क्रीयता व क्रुरता स्पष्टपणे दिसून येत आहे. या घटनेबाबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने भूमिका मांडतांना या घटनेची जबाबदारी निश्चित करण्यासाठी सरकारने तातडीने दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावून त्यावर चर्चा करणे आवश्यक आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.