शिवसेना नेत्या शायना एनसी यांच्या नावाने फसवणूक; 49 हजारांच्या आमिषाने जवळपास 3 लाखांची लूट

संबंधित व्यक्तींना वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये 49 हजार रुपये पाठवण्याची विनंती करण्यात आली. विश्वास ठेवून काही जणांनी ही रक्कम तातडीने ट्रान्सफर केली.
शिवसेना नेत्या शायना एनसी यांच्या नावाने  फसवणूक; 49 हजारांच्या आमिषाने जवळपास 3 लाखांची लूट

मुंबईत सायबर फसवणुकीचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिवसेना नेत्या शायना एनसी यांच्या नावाने बनावट WhatsApp संदेश पाठवत सायबर भामट्यांनी त्यांच्या परिचितांची लाखो रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणात सहा जणांकडून एकूण 2 लाख 95 हजार रुपये उकळण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेप्रकरणी गावदेवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. प्राथमिक माहितीनुसार, सायबर गुन्हेगारांनी शायना एनसी यांचे नाव, मोबाईल क्रमांक आणि डिस्प्ले फोटो (डीपी) वापरून त्यांच्या संपर्कातील व्यक्तींना WhatsApp संदेश पाठवले. सुरुवातीला "Hi Needed some help plz, can I send 49,000 to a number" असा संदेश पाठवून विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर संबंधित व्यक्तींना वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये 49 हजार रुपये पाठवण्याची विनंती करण्यात आली. विश्वास ठेवून काही जणांनी ही रक्कम तातडीने ट्रान्सफर केली.

या फसवणुकीत अनर्वी भगत, मृणाल तलवरे, निकिता जाधव, वृषा भंसाळी, विवेक सज्जन आणि दरयश धामे या सहा जणांची फसवणूक झाली असून, त्यांच्याकडून मिळून 2 लाख 95 हजार रुपये आरोपींनी उकळल्याचे समोर आले आहे. हा प्रकार 16 जुलै रोजी घडल्याची नोंद आहे.

या घटनेनंतर शायना एनसी यांचे स्वीय सहाय्यक निलेश धोंडे यांनी गावदेवी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे भारतीय न्याय संहिता कलम 318(4) आणि 356(2) तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 66(C) व 66(D) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

सध्या गावदेवी पोलीस आणि सायबर यंत्रणा या प्रकरणाचा तपास करत असून, वापरण्यात आलेली बँक खाती, मोबाईल क्रमांक आणि डिजिटल व्यवहारांचा मागोवा घेत आरोपींचा शोध सुरू आहे. दरम्यान, कोणत्याही परिचित व्यक्तीच्या नावाने पैसे मागणारा संदेश मिळाल्यास संबंधित व्यक्तीशी थेट संपर्क साधून खात्री केल्यानंतरच आर्थिक व्यवहार करावेत, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version