Shahapur waterfall accident: शहापूर चोंढा घाटघर धबधब्यावर ढगफुटी सदृश पाऊस; दोन तरुण वाहून गेले, एकाचा मृत्यू

अचानक ढगफुटी सदृश पावसामुळे धबधब्यावरील पाण्याचा प्रवाह काही क्षणांतच प्रचंड वेगाने वाढला. त्यामुळे पाचही जण पाण्याच्या लोंढ्यात वाहून गेले.
Shahapur waterfall accident: शहापूर चोंढा घाटघर धबधब्यावर ढगफुटी सदृश पाऊस; दोन तरुण वाहून गेले, एकाचा मृत्यू

शहापूर तालुक्यातील डोळखांबजवळील चोंढा घाटघर प्रकल्प परिसरात रविवारी ढगफुटी सदृश मुसळधार पावसामुळे मोठी दुर्घटना घडली. हनुमान धबधब्यावर पिकनिकसाठी गेलेल्या पाच तरुणांपैकी दोघे पाण्याच्या प्रचंड प्रवाहात वाहून गेले. यापैकी आकाश महेंद्र देशमुख याचा मृतदेह सापडला असून दिनेश मेंडलकर याचा शोध अद्याप सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण आणि मुरबाड येथील प्रसाद रमेश इंगळे, नितेश लहू पाटील, अजय कृष्णा मिरकुटे, आकाश महेंद्र देशमुख आणि दिनेश मेंडलकर हे पाच मित्र चोंढा घाटघर येथील हनुमान धबधब्यावर फिरण्यासाठी आले होते. त्यावेळी अचानक ढगफुटी सदृश पावसामुळे धबधब्यावरील पाण्याचा प्रवाह काही क्षणांतच प्रचंड वेगाने वाढला. त्यामुळे पाचही जण पाण्याच्या लोंढ्यात वाहून गेले.

हेही वाचा – Palghar : पालघरमध्ये मच्छीमारांनी दाखवलं अद्वितीय शौर्य; पूराच्या प्रवाहात अडकलेल्या चिमुकल्याच्या बचावाचा थरारक व्हिडिओ समोर 

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अथक प्रयत्नांनंतर प्रसाद रमेश इंगळे, नितेश लहू पाटील आणि अजय कृष्णा मिरकुटे या तिघांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.मात्र आकाश महेंद्र देशमुख आणि दिनेश मेंडलकर हे दोघे बेपत्ता झाले होते. बचाव पथकाने शोधमोहीम राबविल्यानंतर काही वेळाने आकाश महेंद्र देशमुख याचा मृतदेह सापडला. तर दिनेश मेंडलकर याचा शोध संध्याकाळपर्यंत सुरू होता. मात्र अंधार आणि प्रतिकूल हवामानामुळे शोधकार्याला अडथळे निर्माण झाल्याने मोहीम तात्पुरती स्थगित करण्यात आली.

किन्हवली पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खैरनार यांनी सांगितले की, अंधारामुळे शोधकार्य थांबवण्यात आले असून सकाळी पुन्हा बचाव पथकाच्या मदतीने शोधमोहीम सुरू केली जाणार आहे. दरम्यान, पावसाळ्यात धबधबे, नदीकाठ आणि ओढ्यांच्या परिसरात अचानक पाण्याची पातळी वाढण्याचा धोका कायम असतो. त्यामुळे अशा ठिकाणी पर्यटन किंवा पिकनिकसाठी जाताना अत्यंत सावधगिरी बाळगावी, तसेच प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने नागरिकांना केले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version