साताऱ्यात वाघनखाच्या स्वागतासाठी सोहळा

छत्रपती शिवाजी महाराजांचे वाघनख हे ऐतिहासिक शस्त्र सातारा येथे आणण्यात आले आहे. वाघनख साताऱ्यात आणल्याच्या निमित्ताने जिल्हा प्रशासनाकडून विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
साताऱ्यात वाघनखाच्या स्वागतासाठी सोहळा

सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांचे वाघनख हे ऐतिहासिक शस्त्र सातारा येथे आणण्यात आले आहे. हे वाघनख सातारा येथील संग्रहालयात ठेवले आहे. साताऱ्याच्या संग्रहालयात पुढील सात महिने वाघनख असेल. नागरिक संग्रहालयाला भेट देऊन ऐतिहासिक वाघनख बघू शकतील. वाघनखाच्या सुरक्षेसाठी संग्रहालयात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था आणि पोलीस बंदोबस्त अशी रचना करण्यात आली आहे. 

वाघनखांचा इतिहास

वाघनख हे शिवाजी महाराजांच्या शस्त्रागारात पहिल्यांदा तयार करण्यात आलेले शस्त्र आहे. हे बोटात अंगठीप्रमाणे घालून आणि हाताच्या मुठीत लपवून सोयीनुसार सहजतेने वापरण्याचे प्रभावी शस्त्र आहे. याला वाघाच्या पंज्यावरील नखांप्रमाणे तीक्ष्ण पोलादी टोकं आहेत. मूठ वळल्यावर ती पंजात लपवता येतात. हे ह्त्यार हातामध्ये धारण करून मूठ बंद केल्यावर बोटात दोन अंगठया (तर्जनी-करंगळी घालण्यासारखे दोन अंगठ्या/गोल) घातल्याप्रमाणे दिसते. त्या अंगठया आतील बाजूने एका धातूपट्टीने जोडलेल्या असून त्यावर तीक्ष्ण नखे लावलेली असतात. यांचा उपयोग लक्ष्यावर गुप्तपणे हल्ला चढवण्यासाठी केला जाई. शिवाजी महाराजांनी १० नोव्हेंबर १६५९ रोजी आदिलशाही सरदार अफझल खान याला जावळीच्या युद्धात ठार मारण्यासाठी वाघनखाचा वापर केला होता. 

विशेष समारंभ

वाघनख साताऱ्यात आणल्याच्या निमित्ताने जिल्हा प्रशासनाकडून विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यात जिल्हास्तरावर महानाट्याचे आयोजन, छत्रपती शिवाजी महाराजांच्याशी निगडीत घटना, स्थळे आणि महनीय व्यक्ती यांच्यावर आधारित १३ विशेष टपाल तिकिटांचे व टपाल आवरणाचे अनावरण करण्यात आले. 

या ऐतिहासिक सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, श्रीमंत संभाजीराजे छत्रपती आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीत शस्त्रप्रदर्शनाचेही उद्घाटन करण्यात आले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version