औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत भाजप आमदार प्रशांत बंब यांच्या शेतकरी सभासद कामगार पॅनेलचा धक्कादायक पराभव झाला आहे. शिवसेनेचे (ठाकरे गट) उपजिल्हाप्रमुख कृष्णा पाटील डोणगावकर यांच्या शिवशाही शेतकरी विकास पॅनेलने २१ पैकी २० जागांवर विजय मिळवला आहे. लासूर स्टेशन गटातून आमदार प्रशांत बंब यांचा पराभव झाल्यामुळं औरंगाबादेत भाजपसाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.
गंगापूर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत ५४ टक्के मतदान झालेलं होतं. २१ संचालकांच्या जागांवरील एका जागेवर बिनविरोध निवड झाल्यामुळं २० जागांवर मतदान झालं होतं. परंतु महाविकास आघाडीच्या शिवशाही शेतकरी विकास पॅनेलने २० पैकी २० जागांवर विजय मिळवला आहे. गेल्या दशकभरापासून आमदार प्रशांत बंब यांच्या पॅनेलची गंगापूर सहकारी साखर कारखान्यावर सत्ता होती. डोणगावकर यांच्या कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्राबाहेर जल्लोष सुरु केला आहे. यावेळी त्यांच्या शिवशाही पॅनेलच्य विजयी उमेदवारांनी गुलाल उधळत विजय साजरा केला आहे. तसेच यावेळी जोरदार घोषणाबाजी पाहायला मिळाली. तर आमचा विजय झाला असल्याचं म्हणत, कृष्णा डोणगावकर यांनी देखील विजयाचा जल्लोष साजरा केला.
गंगापूर सहकारी साखर कारखाना गेल्या १२ वर्षांपासून बंद पडलेला आहे. कारखान्यावर ३५ कोटी रुपयांचं कर्ज असल्यानं सहकारी बँकेनं कारखाना विक्रीसाठी काढला होता. त्यानंतर सोलापुरच्या जयहिंद शूगरला हा कारखाना भाडेतत्वावर चालवण्यास देण्यात आला होता. परंतु त्यात अद्यापही कोणतीही प्रगती झालेली नाही. त्यामुळं आता बंद पडलेल्या कारखान्याची निवडणूक पार पडल्यानंतर आता तरी कारखाना सुरू होईल, अशी आशा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.