Santosh Deshmukh Murder Case : "माझं काही बरं-वाईट झालं तर.. म्हणत वडिलांनी सांगितलं, ‘त्याचा’ फोन होता," लेकीचा काळीज पिळवटणारा जबाब

Santosh Deshmukh Case: माझं काही बरं-वाईट झाले तर आई आणि विराजची काळजी घे..असं संतोष देशमुख यांनी 'त्या' व्यक्तीशी फोनवर बोलणं झाल्यावर आपली मुलगी वैभवीला सांगितलं. वैभवी हिचा जबाब आता समोर आला आहे.
Santosh Deshmukh Murder Case : "माझं काही बरं-वाईट झालं तर.. म्हणत वडिलांनी सांगितलं, ‘त्याचा’ फोन होता," लेकीचा काळीज पिळवटणारा जबाब

Santosh Deshmukh Murder Case, बीड : सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील वैभवी देशमुखचा जबाब समोर आला आहे. माझे काही बरे वाईट झाले तर आई आणि विराजची काळजी घे..असं संतोष देशमुख यांनी आपल्या मुलीला सांगितलं असल्याचं तिच्या जबाबात समोर आलं आहे. "भाऊ एवढं काय झालं नाही. कशाला एवढं ताणता भाऊ, एवढ्या लहान गोष्टीसाठी जीवावर उठता का?" असं पप्पा त्या माणसाशी फोनवर बोलत होते. हा फोन 10-12 मिनिटे सुरू होता, अशी माहिती वैभवी देशमुखने आपल्या जबाबामध्ये दिली आहे. हा कॉल विष्णू चाटेचाच होता, असं संतोष देशमुख यांनी  मुलीला सांगितलं होतं. विष्णू चाटे सध्या अटकेत आहे.

माझं काही बरं वाईट झालं तर…
माझं काही बरं वाईट झालं तर आई आणि विराजची काळजी घे असा भावनिक संवाद संतोष देशमुखांनी मुलगी वैभवीशी केला होता. वैभवी देशमुखने याबाबत पोलिसांना जबाब दिला आहे.  या जबाबानुसार, अपहरणाच्या आदल्या दिवशी म्हणजे 8 डिसेंबर 2024ला देशमुखांना चाटेचा धमकावणारा फोन आला होता. त्यानंतर त्यांनी वैभवीला हे सांगितलं असल्याचं समोर आलं आहे. दोषारोप पत्रात देशमुख कुटुंबात, पत्नी अश्विनी देशमुख, भाऊ धनंजय देशमुख यांचे जबाब महत्त्वाचे आहेत. त्या देशमुख कुटुंबाच्या जबाबात संतोष देशमुख यांनी हत्येच्यापूर्वी काय बोलले होते याचा समावेश असल्याची माहिती आहे.

सरपंच देशमुख यांच्या हत्येचे मूळ आवादा कंपनीच्या खंडणी प्रकरणात असल्याचे दोषारोपपत्रातून समोर आले आहे. आवादाच्या दोन कोटींच्या खंडणीला सरपंच देशमुख यांनी विरोध केल्यानेच ते मारेकऱ्यांच्या टार्गेटवर आल्याचे पोलिसांनी दोषारोपपत्रात म्हटले आहे. हत्येआधी काही दिवस वाल्मीक कराड आणि त्याची गँग देशमुखांना जीवे मारण्याच्या धमक्या देत होते. या धमक्यांनी देशमुख यांना स्वतःचे काहीतरी बरे-वाईट होण्याची चाहुल आधीच लागलेली होती.

हेही वाचा – Santosh Deshmukh Murder Case : धनंजय मुंडे 3 मार्चला राजीनामा देणार? ‘या’ व्यक्तीची पोस्ट व्हायरल

सरपंच देशमुख यांची लेक वैभवी देशमुख हिने पोलिसांना जबाब दिला आहे. हत्येआधीच्या दोन-तीन दिवसांआधी नेमकं काय घडलं? त्यांनी नेमकं काय सांगितलं? त्यांना कुणाचे फोन येत होते? अशा प्रश्नांची उत्तरे वैभवीने पोलीस जबाबात दिली आहे.

वैभवीने जबाबात काय सांगितलं?
वैभवी देशमुखने दिलेल्या जबाबानुसार, माझे पप्पा मस्साजोग मधून लातूरला आले होते. त्या दिवशी ते अस्वस्थ असल्याचे दिसून आले. दुसऱ्या दिवशी पण पप्पा मला काळजीत असल्याचे दिसत होते. मी त्यांना काय झालं म्हणून विचारलं. तेव्हा त्यांनी मला जवळ घेऊन म्हणाले की, बाळा चांगला अभ्यास कर… त्यावर मी त्यांना विचारले की, काय झालं पप्पा? त्यावर ते काही सांगण्यास तयार नव्हते. परंतु मी त्यांना वारंवार विचारलं की, मला सांगा पप्पा काय झालं आहे. तेव्हा त्यांनी 6 डिसेंबरला अवादा कंपनीमध्ये वाल्मीक अण्णांची माणसे खंडणी मागण्यासाठी आणि कंपनी बंद करण्यासाठी कंपनीत आली होते. मी त्यांना अडवलं होतं. त्यामुळे त्यांना खूप राग आला.

हत्येपूर्वी संतोष देशमुख यांनी वैभवीशी बोलताना वाल्मीक कराडचं नाव घेतलं होतं
वाल्मिक कराड हा गुंड प्रवृत्तीचा माणूस आहे, त्याचा बीड जिल्हयात दबदबा आहे. त्याला खूप माणसं घाबरतात. तसेच त्याच्या जवळचा माणूस विष्णू चाटे हा मला सारखा फोन करुन ठार मारण्याची धमकी देत आहे. त्यामुळे मला टेन्शन आलं आहे. माझं काही बरं-वाईट झालं तर आई व विराजची काळजी घे. असं संतोष देशमुख मुलगी वैभवीला म्हणत होते.

तू घाबरु नकोस मी यातून काही मार्ग काढतो..
त्यानंतर दुसऱ्या दिवशी विष्णू चाटे याचा फोन होता. तो फोनवरून म्हणत होता, तू वाल्मिक अण्णा व आमच्याशी पंगा घेतला आहे, तुला जिवंत सोडणार नाही. " पप्पांनी त्यावेळी मला असे ही सांगितले की, " तू घाबरू नकोस, मी यातून काही मार्ग काढतो, असेही वैभवी म्हणाली. विष्णू चाटेचा फोन जवळपास 10 ते 12 मिनिटे सुरू होता. त्यावेळी पप्पा खूप घाबरले होते, असा जबाब लेक वैभवीने पोलिसांसमोर नोंदवला आहे.

'मी त्यांची समजूत काढली'
माझे काही बरे वाईट झाले तर आई आणि विराजची काळजी घे… असे ते मला म्हणाले. त्यावर मी त्यांची समजूत काढली. तुम्ही स्वत:साठी काही करत नाहीत. तुम्ही गावासाठीच करताय, त्यामुळे काही चिंता करू नका, असे म्हणून मी त्यांना धीर दिला. परंतु तरीही पप्पा खूप घाबरलेले होते.

मारेकऱ्यांना कोणी पाठवले, खंडणी कोणासाठी होती?
माझ्या वडिलांची हत्या ही खंडणीतूनच झाली आहे. परंतु, या लोकांना खंडणी मागायला कोणी पाठवले? त्यांना कोणाचा वरदहस्त होता? असा सवाल सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवीने केला आहे. तसेच ही खंडणी कोणासाठी जात होती? याचीही चौकशी करून त्यांनाही सहआरोपी करावे, अशी मागणीही वैभवीने केली आहे.

हातपाय तोडा, पण… जगू द्या..
माझ्या बाबांना बेदम मारहाण करण्यात आली. ते हातपाय तोडा, पण गाव, मुलांसाठी जगू द्या, अशी विनवणी करत होते. परंतु, त्यांनी कसलीही दयामाया दाखवली नाही, ते निर्दयीपणे मारहाण करीतच राहिले, असेही वैभवी म्हणाली आहे.

हेही वाचा – स्वारगेट बलात्कार प्रकरण: आरोपीला अटक; 'गळ्यावर दोरीचे वळ, आत्महत्येचा प्रयत्न?' पोलिसांची माहिती

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version