मुंबई : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सात जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपने आपले चार उमेदवार आधीच निश्चित केले होते. मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून आणि महाविकास आघाडीकडून राज्यसभेचा उमेदवार कोण असणार, याबाबत शेवटच्या क्षणापर्यंत उत्सुकता कायम होती. अखेरीस शिंदे यांच्या शिवसेनेकडून ज्योती वाघमारे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. आज, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ज्योती वाघमारे यांनी राज्यसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. ज्योती वाघमारे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शिवसेनेतील ज्येष्ठ नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आता मंत्री संजय शिरसाट यांनी ज्योती वाघमारे यांना उमेदवारी दिल्यानंतर आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
संजय शिरसाट म्हणाले की, तुमचा सस्पेन्स दूर केला आहे. ज्योती वाघमारे यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. शिंदेसाहेब माझी लाडकी बहीण म्हणतात, लाडक्या बहिणीला उमेदवारी दिली आहे. ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी आम्ही प्रयत्न केला. या निवडणुकीत घोडेबाजार होणार नाही, याची आम्ही काळजी घेऊ. शिंदेसाहेब सगळ्यांना सामावून घेतात. कोणी नाराज असेल तर त्यांची नाराजी एकनाथ शिंदे दूर करतील. नेमका वेळेला, नेमका विचार म्हणजे एकनाथ शिंदे. आम्ही मानसिक आणि राजकीय बळ वाघमारे यांना दिले आहे. सर्वसामान्य शिवसैनिक जी एका छोट्या गावातून येते. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी त्यांना नाही. पण, त्यांनी सभा गाजवल्या. शिवसेनेत येऊन मेहनत घेतली आहे. त्यामुळे या सगळ्यांचा विचार करून निर्णय घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.