शिबिराला गालबोट लावण्यासाठी दर्ग्यावर कारवाई, संजय राऊतांचा गंभीर आरोप

आजच नाशिकमध्ये शिवसेना (ठाकरे गट) चं निर्धार शिबिर सुरू असून, यावरून खासदार संजय राऊत यांनी भाजपवर थेट आरोप केले आहेत.
शिबिराला गालबोट लावण्यासाठी दर्ग्यावर कारवाई, संजय राऊतांचा गंभीर आरोप

मुंबई: नाशिकमधील काठे गल्ली भागात मध्यरात्री सुरू झालेल्या अनधिकृत दर्गा हटाव मोहिमेमुळे शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. पोलिसांनी कारवाई सुरू केल्यानंतर काही जमावाने दगडफेक केल्याने काही पोलीस जखमी झाले. पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी बळाचा वापर केला. या साऱ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, आजच नाशिकमध्ये शिवसेना (ठाकरे गट) चं निर्धार शिबिर सुरू असून, यावरून खासदार संजय राऊत यांनी भाजपवर थेट आरोप केले आहेत.

संजय राऊत म्हणाले की, 'आजच्या दिवशीच ही कारवाई का झाली, हे आता स्पष्ट होतंय. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि सर्व प्रमुख नेते नाशिकमध्ये आहेत. त्यामुळे शिबिराच्या पार्श्वभूमीवर वातावरण गढूळ करण्याचा भाजपचा हा डाव आहे. आमच्या कार्यक्रमावर लक्ष विचलित व्हावं म्हणून दर्ग्यावर कारवाई केली जात आहे. ही भीती आणि दुर्बळपणाचं लक्षण आहे. आमच्याशी थेट लढण्याची हिंमत नाही म्हणून अशा शक्कल लढवल्या जात आहेत.'

राऊत पुढे म्हणाले की, 'ही कारवाई काही दिवसांनीही होऊ शकली असती. मात्र नेमका आजचाच दिवस निवडण्यात आला. भाजपला शिवसेनेच्या अस्तित्वाची भीती वाटते. त्यामुळे अशा घटना घडवल्या जातात. पण या साऱ्या प्रकारांचा आमच्या निर्धार शिबिरावर काहीही परिणाम होणार नाही. उलट, अशा कारवाया भाजपचं खऱ्या अर्थाने भीतीदायक मानसिकतेचं दर्शन घडवतात.' 

याप्रकरणी आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे, या कारवाईसाठी पंधरा दिवसांपूर्वीच नोटीस देण्यात आली होती आणि त्या नोटीसीची मुदत कालच संपली होती. मात्र यावरही राऊत यांनी भाजपवर टीका करत म्हटलं की, 'भाजपचे लोक मुहूर्त ठरवतात कधी दंगल घडवायची, कधी कारवाई करायची, याचा संपूर्ण आराखडा तयार असतो. पंचांग पाहून ते राजकारण करतात.' असा आरोप करत त्यांनी भाजपच्या रणनीतीवर जोरदार हल्ला चढवला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version