यवतमाळ: यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघातील राजकारण सध्या चांगलेच तापले असून विकासनिधीच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा चर्चा रंगू लागली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून बाहेर पडत शिंदे गटात प्रवेश केलेल्या खासदार संजय देशमुख यांच्या मतदारसंघासाठी तब्बल 9 कोटी 40 लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती समोर आली आहे.
विशेष म्हणजे, एका बाजूला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे फुटीर खासदारांच्या मतदारसंघात दौरे करत असताना, दुसऱ्या बाजूला महायुती सरकारकडून या मतदारसंघासाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर अनेक खासदार आणि आमदारांनी विकासकामांसाठी आवश्यक निधी मिळत नसल्याचे कारण देत पक्षाला रामराम ठोकला होता. त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. संजय देशमुख यांनीही अशाच कारणांचा उल्लेख करत शिंदे गटात प्रवेश केला होता.
शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघातील विविध नगरपरिषदांसाठी मोठा निधी मंजूर झाल्याची माहिती स्वतः संजय देशमुख यांनी सोशल मीडियावरून दिली आहे. त्यांनी या निर्णयाबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच महायुती सरकारचे आभारही मानले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, यवतमाळ नगरपरिषदेसाठी 2 कोटी 5 लाख रुपये, वाशीमसाठी 1 कोटी 65 लाख रुपये, मंगरुळपीरसाठी 80 लाख रुपये, कारंजा नगरपरिषदेसाठी 1 कोटी 50 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
तसेच कळंबसाठी 1 कोटी 20 लाख, दिग्रससाठी 1 कोटी 45 लाख आणि राळेगावसाठी 75 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या निधीतून विविध विकासकामे हाती घेतली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांचा मतदारसंघातील दौरा आणि त्याचवेळी विकासनिधीची घोषणा यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे यवतमाळ-वाशीममधील राजकारण आणखी रंगण्याची चिन्हे दिसत आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.