पुण्यातील केतन अगरवाल हत्या प्रकरण ताजे असतानाच सांगलीतील विश्रामबाग परिसरात एक थरारक घटना समोर आली आहे. येथे पत्नीने आपल्या प्रियकराच्या साथीने पतीचा खून करून तो झोपेतच मृत्यू झाल्याचा बनाव रचल्याचे उघड झाले आहे.
आनंद हणमंत सर्जे (वय २८, रा. पोळमळा, सांगली) असे मृत तरुणाचे नाव असून तो शहरातील एका ब्रँडेड कपड्यांच्या दुकानात सेल्समन म्हणून काम करत होता. तो पत्नी आणि दोन मुलांसोबत राहत होता. गुरुवारी पहाटे त्याला गंभीर अवस्थेत शासकीय रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
प्राथमिक तपासणीत पोलिसांना संशय आल्याने मृतदेहाची सखोल पाहणी करण्यात आली. त्यावेळी गळ्यावर जखमेचे खुणा आढळल्याने प्रकरण संशयास्पद वाटले. पत्नीने दिलेल्या जबाबात तो आधी मारहाणीत जखमी झाला आणि नंतर झोपेतच मृत्यू झाला असे सांगितले, मात्र तिच्या विधानात विसंगती आढळली. यानंतर मृतदेह मिरजेतील शासकीय रुग्णालयात पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आणि त्यातून खुनाचे स्पष्ट पुरावे समोर आले. पोलिसांनी तपासाची दिशा बदलत पत्नी आणि तिच्या प्रियकराला चौकशीसाठी ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान असे निष्पन्न झाले की पतीकडून होणाऱ्या दारू पिण्याच्या आणि मारहाणीच्या त्रासामुळे पत्नीने प्रियकराच्या मदतीने हा कट रचला. पहाटेच्या वेळी झालेल्या वादानंतर तिने प्रियकराला घरी बोलावले आणि दोघांनी मिळून पतीचे पाय बांधून छातीवर बसून गळा दाबून त्याचा जीव घेतला. नंतर मृत्यू नैसर्गिक असल्याचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र पोलिसांच्या काटेकोर तपासामुळे हा बनाव उघडकीस आला आणि दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.