सांगली शहरातील संजयनगर परिसरातील एसटी कॉलनी येथे गुरुवारी रात्री घडलेल्या थरारक गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. चार ते पाच हल्लेखोरांनी घरात घुसून 14 वर्षीय वेदांत मारुती बंडगर याची गोळ्या झाडून निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, वेदांत बंडगर हा स्थानिक हमाल नेत्याचा नातू होता. गुरुवारी रात्री चार ते पाच जणांच्या टोळीने बंडगर यांच्या घरात घुसून गोळीबार केला. या गोळीबारात वेदांत गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक तुषार दोशी, वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी परिसराची नाकेबंदी करून हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे. घटना स्थळावरून महत्त्वाचे पुरावे गोळा करण्यात येत असून सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी सुरू आहे. प्राथमिक तपासात माथाडी कामगारांमधील जुन्या वादातून ही घटना घडल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र हत्येमागील नेमके कारण आणि हल्लेखोरांची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नाही.
या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू असून आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. अल्पवयीन मुलाची घरात घुसून हत्या झाल्याने सांगली शहरात खळबळ उडाली असून या घटनेमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलीस तपासाच्या पुढील घडामोडीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.