नाशिक महापालिकेकडून साधुग्राम परिसरातील 1825 झाडांची प्रस्तावित तोड पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली असून नागरिकांसह पर्यावरणप्रेमींमध्ये तीव्र नाराजी उसळली आहे. या निर्णयाच्या विरोधात आता नव्या आंदोलनाची तयारी जोरात सुरू झाली आहे आणि सेलिब्रेटींसह अनेक पर्यावरण कार्यकर्ते प्रत्यक्ष मैदानात उतरणार आहेत. प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे, सामाजिक उपक्रमांसाठी ओळखले जाणारे वरुण सुखराज, तसेच मुंबईतील विविध पर्यावरणवादी संघटनांचे प्रतिनिधी लवकरच नाशिकला भेट देणार आहेत. प्रत्यक्ष स्थळाची पाहणी करून आंदोलनाची दिशा आणि स्वरूप ठरवण्याची तयारी आहे. सिंहस्थ मेळ्याच्या तयारीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर झाडांची तोड करणे पर्यावरणासाठी घातक ठरेल, असे नागरिकांनी महापालिकेच्या जनसुनावणीत स्पष्टपणे सांगितले होते.
दरम्यान, नाशिकमध्ये आयोजित आंदोलनात सयाजी शिंदे यांनी झाडतोडीविरोधात जोरदार आक्रोश व्यक्त केला. ते म्हणाले की, “साधू आले, गेले मला माहित नाही; पण झाडे कायम राहिली पाहिजेत.” त्यांनी सरकारवर टीका करत सांगितले, “झाड म्हणजे काय, याची व्याख्या अजूनही राज्य सरकारला समजलेली नाही. सर्वाधिक वडाची झाडे आपल्या सरकारनेच तोडली आहेत.” शिंदे पुढे म्हणाले, “झाडे म्हणजे आमचे आई-वडील आहेत. आमच्या आई-वडिलांवर हल्ला झाला तर आम्ही शांत बसणार नाही.” त्यांनी गिरीश महाजन यांना उद्देशून म्हटले, “तुमच्याशी माझी काही दुश्मनी नाही, झाली तरी हरकत नाही.”
ते पुढे म्हणाले, “जगात एकच खरा सेलिब्रेटी असेल तर तो झाड आहे. राम नंतर आले, आधी झाडे आली… आणि झाडे जगली पाहिजेत.” नाशिककरांचे कौतुक करत ते म्हणाले, “नाशिककर चांगली माणसे आहेत. साधू-संत असतात ते गर्दी करत नाहीत. हिरव्या फुल्या मारून हा कसला मेळावा लावला आहे? 220 कोटींचे टेंडर काढून हा प्रकार करणे योग्य नाही.” ते पुढे म्हणाले, “ही झाडे तोडू नका. मला कधीही बोलवा, मी लगेच येईल. शासन काहीही करो, आम्ही नाशिककरांसोबत उभे आहोत.”
याच पार्श्वभूमीवर महापालिकेच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. शहरातील अनेक नागरिक या याचिकेत सहभागी होणार असून न्यायालयीन लढ्याला मोठा पाठिंबा मिळणार आहे. दुसरीकडे, सोशल मीडियावर व्यापक प्रमाणात जनजागृती मोहीम उभी करण्याची तयारीही सुरू आहे. सेलिब्रेटी, पर्यावरण कार्यकर्ते आणि स्थानिक संघटना यांच्या संयुक्त नेतृत्वाखाली हे आंदोलन अधिक व्यापक रूप धारण करत असल्याचे संकेत मिळत आहेत.
पुढील दोन दिवसांत आंदोलक साधुग्राम परिसराची प्रत्यक्ष पाहणी करणार असून त्यानंतर आंदोलनाची पुढील रणनीती निश्चित केली जाणार असल्याचे पर्यावरण कार्यकर्ते राजू देसले यांनी सांगितले. नाशिकमध्ये झाडतोडीच्या प्रस्तावाचा मुद्दा आता केवळ स्थानिक न राहता राज्यभरातील पर्यावरण कार्यकर्त्यांचे लक्ष वेधत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.