Sachin Tendulkar: सचिन तेंडुलकर IPL च्या ‘त्या’ नियमावर नाराज; सुचवले महत्त्वाचे 3 बदल, BCCI काय निर्णय घेणार?

आयपीएलमध्ये फलंदाजांचे वाढते वर्चस्व पाहता सचिन तेंडुलकरने मोठे नियम बदल सुचवले आहेत.
Sachin Tendulkar: सचिन तेंडुलकर IPL च्या ‘त्या’ नियमावर नाराज; सुचवले महत्त्वाचे 3 बदल, BCCI काय निर्णय घेणार?

आयपीएलच्या अंतिम सामन्याची रंगत शिगेला पोहोचली असतानाच क्रिकेटविश्वात आणखी एका चर्चेने जोर धरला आहे. भारतीय क्रिकेटमधील दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरने आयपीएलमधील काही नियमांवर प्रश्न उपस्थित करत मोठे बदल सुचवले आहेत. त्याच्या मते, सध्याच्या टी-20 क्रिकेटमध्ये फलंदाजांचे वर्चस्व वाढत असून गोलंदाजांसाठी परिस्थिती अधिक कठीण बनत चालली आहे.

मुंबईत झालेल्या एका क्रिकेट पुरस्कार सोहळ्यात बोलताना सचिन तेंडुलकरने विशेषतः ‘इम्पॅक्ट प्लेयर’ नियमावर नाराजी व्यक्त केली. सचिनच्या मते, या नियमामुळे संघांना अतिरिक्त फलंदाज खेळवण्याचा फायदा मिळतो आणि त्यामुळे खेळातील समतोल बिघडतो. 2023 पासून आयपीएलमध्ये लागू झालेल्या या नियमामुळे सामन्यादरम्यान अंतिम अकरातील एखाद्या खेळाडूच्या जागी पर्यायी खेळाडू उतरवण्याची मुभा संघांना मिळते.

हेही वाचा: Singapore Open Super 750: सिंगापूर ओपनमध्ये सात्विक-चिरागची आक्रमक खेळी; जागतिक क्रमवारीत नंबर 1 जोडीचा पराभव करत फायनलमध्ये धडक

सचिनच्या मते, टी-20 क्रिकेट आधीच फलंदाजांसाठी अनुकूल झालेले आहे. अशा परिस्थितीत आणखी एका फलंदाजाला खेळवण्याची संधी देणे गोलंदाजांवर अन्यायकारक ठरते. सचिनने स्पष्टपणे सांगितले की, ‘खेळात समतोल राखायचा असेल तर इम्पॅक्ट प्लेयर नियमाचा फेरविचार होणे गरजेचे आहे.’

याचवेळी सचिनने पॉवरप्ले नियमातही बदल सुचवला. सध्या डावाच्या सुरुवातीची सहा षटके फलंदाजांसाठी पॉवरप्ले म्हणून राखीव असतात. मात्र, सचिनच्या मते पहिली चार षटके निश्चित पॉवरप्ले असावीत आणि उर्वरित दोन षटके कर्णधाराला त्याच्या रणनीतीनुसार वापरण्याची मुभा दिली पाहिजे. यामुळे गोलंदाजांना काही प्रमाणात मदत मिळेल आणि सामना अधिक चुरशीचा होईल, असे सचिनने सांगितले.

हेही वाचा: RCB vs GT IPL Final 2026: आरसीबी विरुद्ध गुजरात हाय-व्होल्टेज सामना! विजेत्या संघावर पैशांचा वर्षाव; उपविजेत्याला किती रुपये मिळणार? जाणून घ्या A टू Z माहिती

सचिन तेंडुलकरने आणखी एक मोठा प्रस्ताव मांडताना प्रत्येक गोलंदाजाला चारऐवजी पाच षटके टाकण्याची परवानगी द्यावी, असे मत व्यक्त केले. सचिनच्या मते, एखादा फलंदाज संपूर्ण 20 षटके फलंदाजी करू शकतो, तर संघातील सर्वोत्तम गोलंदाजाला अतिरिक्त एक षटक टाकण्याची संधी का दिली जाऊ नये? या बदलामुळे संघांना आपल्या प्रमुख गोलंदाजांचा अधिक प्रभावी वापर करता येईल, असेही त्याने नमूद केले.

गेल्या काही हंगामांमध्ये आयपीएलमध्ये मोठ्या धावसंख्या, आक्रमक फलंदाजी आणि गोलंदाजांची वाढती धावपळ याबाबत सातत्याने चर्चा होत आहे. अनेक माजी क्रिकेटपटूंनीही यापूर्वी इम्पॅक्ट प्लेयर नियमावर टीका केली होती. काहींच्या मते, या नियमामुळे अष्टपैलू खेळाडूंचे महत्त्व कमी होत असून संघरचनेतील संतुलन बिघडत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version