कर्नाटक विधानसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी जोरदार प्रचार केला होता. तर या निवडणुकीत काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला तर, भाजपाचा दारुण पराभव झाला होता. या विजयामुळे काँग्रेसचा आत्मविश्वास चांगलाच वाढला असून “आरएसएसच्या सर्व्हेने भाजपात खळबळ, मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचं सरकार येत आहे”, असा मोठा दावा काँग्रेसने केला. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर काँग्रेसने मध्य प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकींबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (आरएसएस) उल्लेख करत मोठा दावा केला आहे.
नेमकं काय म्हणालाय काँग्रेस?
“मध्य प्रदेशमध्ये यावर्षाच्या शेवटी विधानसभा निवडणूक होत आहे. या निवडणुकीआधी अनेक सर्व्हे समोर आले आहेत. यात मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचं सरकार येत असल्याचं दिसत आहे. भाजपाला केवळ ५५ जागांवर समाधान मानावं लागणार आहे. काँग्रेसकडे २०१८ च्या १५ महिन्यांचा कार्यकाळाचा अनुभव आणि कमलनाथ यांच्यासारखा निर्विवाद व अनुभवी नेता आहे. हे मुद्दे घेऊन काँग्रेस जनतेसमोर जात आहे.”
‘सर्व्हेंमध्ये भाजपाचा दारूण पराभव होत असल्याचं समोर’
“भाजपाची १८ वर्षांची देणेदारी आणि अपूर्ण घोषणांमुळे जनतेत सरकारविरोधी मोठी लाट तयार झाली आहे. मागील पाच महिन्यात मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीबाबत सहा वेगवेगळे सर्व्हे झाले आहेत. सर्व सर्व्हेंमध्ये भाजपाच्या जागा सातत्याने कमी होताना दिसत आहे. इतकंच नाही, तर सर्व सर्व्हेंमध्ये भाजपाचा दारूण पराभव होत असल्याचं समोर येत आहे,” असा दावा काँग्रेसने केला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.