मी लवकरच क्रांतिकारी निर्णय घेईन असे वक्तव्य विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केले आहे. स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांच्या निर्णय क्षमतेबाबत भाष्य करताना नार्वेकर यांनी हे विधान केले आहे. राज्यातील सत्तासंघर्षाच्या निकालानंतर आमदार निलंबनाचा निर्णय आता विधानसभा अध्यक्षांकडे देण्यात आला आहे. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्ष १६ आमदारांच्या अपात्रतेवर काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागलं असतानाच त्यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
“मी लवकरच क्रांतिकारी निर्णय घेईन” असं वक्तव्य राहुल नार्वेकर यांनी केलं आहे. निर्णय आत्ता सांगणार नाही पण मेरीटच्या आधारावर निर्णय देणार असं सूचक वक्तव्य नार्वेकरांनी केलं आहे. स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांच्यावरील ‘दौलत’ या चरित्रग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यावेळी ते बोलत होते. “बाळासाहेब देसाईंप्रमाणे मी देखील लवकरच क्रांतिकारी निर्णय घेईन. आता निर्णय सांगणार नाही पण मेरीटच्या आधारावर निर्णय देणार” असंही नार्वेकर यांनी म्हंटलं आहे.
पुढे नार्वेकर म्हणाले, “अनंतकाळ आपलं काम गाजवणाऱ्यांपैकी एक बाळासाहेब देसाई होते. ईबीसी, शिक्षण खात्यातही त्यांनी मोठं कार्य केलं. ईबीसी विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याचा क्रांतिकारी निर्णय त्यांनी घेतला. महसूल खात्याची जबाबदारी पार पाडताना त्यांनी अनेक मोठे निर्णय घेतले. मालोजीराजेंनंतर पीडब्ल्यूडीची जबाबदारी बाळासाहेबांकडे आली. त्यावेळी त्यांनी दर्जेदार कार्य त्यांनी केलं. गृहखात्याचीही जबाबदारी त्यांनी उत्कृष्टरित्या पार पाडली.”
“1977 साली माझा जन्म झाला आणि याच साली स्वर्गीय बाळासाहेब देसाईंवर विधानसभा अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. बाळासाहेब देसाईंनी ज्याप्रमाणे अनेक क्रांतीकारी निर्णय आपल्या राजकीय आयुष्यावर घेतले, त्यातूनच शिकून कदाचित मीदेखील लवकरच क्रांतीकारी निर्णय घेईन”, असं ते म्हणाले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.