रत्नागिरी: निसर्गरम्य कोकणातील वळणदार रस्ते पुन्हा एकदा रक्ताने माखले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील चिंद्रवली-कोंडवी परिसरात बुधवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास एका मिनी बसला भीषण अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही बस थेट खोल दरीत कोसळली. या दुर्दैवी घटनेत मोहनेश चंद्रम बडगेर (वय 32, रा. कर्नाटक) या तरुण कामगाराचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य 10 जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, या बसमधील सर्व प्रवासी हे परप्रांतीय मजूर असून ते सध्या हरचेरी येथे रस्ते बांधकामाच्या कामासाठी वास्तव्यास होते. आठवड्याचा बाजार करण्यासाठी आणि जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी हे सर्व मजूर मिनी बसने पाली येथील बाजारपेठेत आले होते. बाजार आटपून आनंदाने घराकडे परतत असतानाच काळाने त्यांच्यावर झडप घातली.
ब्रेक फेल अन् होत्याचं नव्हतं झालं…
बस चिंद्रवली-कोंडवी येथील एका धोकादायक वळणावर आली असता, अचानक गाडीचे ब्रेक निकामी झाले. उतारावर गाडीचा वेग आणि निकामी झालेले ब्रेक यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण पूर्णपणे सुटले. काही सेकंदातच ही बस रस्त्यावरून खाली घसरत थेट 70 फूट खोल दरीत कोसळली. अपघात इतका भीषण होता की, बसचा चक्काचूर झाला. मृत मोहनेश हा चालकाच्या शेजारी बसला होता, गाडी पलटी होताच तो बाहेर फेकला गेल्याने गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला.
स्थानिक देवदूतांसारखे धावले!
अपघाताचा आवाज ऐकताच चिंद्रवली आणि कोंडवी येथील ग्रामस्थांनी तातडीने दरीच्या दिशेने धाव घेतली. कड्याकपारीत अडकलेल्या जखमींना बाहेर काढण्यासाठी स्थानिकांनी शर्थीचे प्रयत्न केले. जखमींना तातडीने रुग्णवाहिकेने रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने, अन्य 10 जणांचे प्राण वाचले असले तरी त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
कोकणातील वळणांवर अपघातांचे सत्र थांबेना
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग आणि त्या जोडणाऱ्या अंतर्गत रस्त्यांवरील अपघातांचे प्रमाण चिंतेचा विषय ठरत आहे. चिंद्रवली-कोंडवीचा हा घाट रस्ता प्रवाशांसाठी मृत्यूचा सापळा बनत चालला आहे की काय, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. तांत्रिक बिघाड की रस्त्याची दुरवस्था? यावर आता पोलीस अधिक तपास करत आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.