शिर्डीत रामनवमी उत्सवाची बुधवारपासून भक्तीमय वातावरणात सुरुवात झाली आहे. गुरुवारी रामनवमीचा मुख्य दिवस असल्यामुळे शिर्डीत साई दर्शनासाठी लाखो भाविकांची मांदियाळी दिसत आहे. उत्सवासाठी साईबाबा मंदिरावर विद्युत रोशनाई तसेच साई मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. तर साईनामाचा जयघोष करत शेकडो पायी पालख्या शिर्डीत दाखल झाल्या आहेत.
भाविकांनी कावडीतून आणलेल्या गोदावरीच्या पाण्याची विधीवत पुजा करून साईमुर्ती आणि साई समाधीला जलाभिषेक करण्यात आला. दरम्यान, सकाळी काकड आरतीनंतर बाबांची पोथी, विणा आणि प्रतीमेची भव्य शोभायात्रा काढण्यात आली.
शिर्डीतील रामनवमी उत्सवाचे यंदाचे हे ११२वे वर्ष आहे. शिर्डीत रामनवमीच्या दिवशी मध्यान्ह आरतीच्या आधी साई मंदिरासमोर रामजन्मोत्सव साजरा करण्यात येतो. दरम्यान, भाविकांमध्ये साईभेटीचा आनंद ओसंडुन वाहत आहे. रामनवमी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर साईं मंदिराला आकर्षक विद्दयुत रोशनाई करण्यात आली आहे. उत्सवाच्या निमित्ताने साई मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. साई मूर्तीलाही विविध अलंकारांनी सजविण्यात आले आहे.
रामनवमी उत्सवात सहभागी होण्यासाठी देशातून भाविक येथे येत असतात. दरम्यान, जास्तीत जास्त भाविकांना दर्शनाचा लाभ मिळावा यासाठी साईमंदिर दर्शनासाठी रात्रभर खुलं ठेवण्यात येणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.