पुणे: विद्येचे माहेरघर मानल्या जाणाऱ्या पुण्यात माणुसकीला काळिमा फासणारी एक संतापजनक आणि अंतःकरण हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. सासरच्या जाचाला, चारित्र्यावर घेतलेल्या संशयाला आणि हुंड्याच्या अमानवी मागण्यांना कंटाळून दीप्ती मगर-चौधरी या उच्चशिक्षित इंजिनियर विवाहितेने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. उरुळी कांचनजवळील सोरतापवाडी येथे 25 जानेवारीच्या रात्री ही हृदयद्रावक घटना घडली. विशेष म्हणजे, ज्या घरात सासू सरपंच आणि सासरे शिक्षक आहेत, अशा सुशिक्षित समजल्या जाणाऱ्या कुटुंबात दीप्तीचा अमानुष छळ झाला, ही बाब संपूर्ण राज्याला सुन्न करणारी आहे.
लग्नाच्या अवघ्या एका महिन्यानंतरच दीप्तीच्या संसारात अंधार दाटू लागला. पती रोहन चौधरी याने तिच्या चारित्र्यावर संशय घेण्यास सुरुवात केली, तर सासरच्या मंडळींनी “तू आमच्या घराच्या प्रतिष्ठेला साजेशी नाहीस” असे म्हणत तिचे मानसिक खच्चीकरण केले. हा छळ केवळ शब्दांपुरता मर्यादित राहिला नाही. व्यवसायाच्या नावाखाली तिच्याकडून 10 लाख रुपये उकळण्यात आले, त्यानंतर चारचाकी गाडीच्या हव्यासापोटी तब्बल 25 लाख रुपयांची मागणी करण्यात आली. मुलीचा संसार वाचावा या आशेने माहेरच्यांनी ही रक्कमही दिली, मात्र छळाची मालिका थांबली नाही.
दीप्तीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, सासरच्या मंडळींची हाव इतकी वाढली होती की तिचे 50 तोळे स्त्रीधन म्हणजेच सोन्याचे दागिनेही तिच्याकडून हिसकावून घेण्यात आले. चोरीचा धोका आहे असे कारण सांगून घेतलेले हे दागिने नंतर व्यवसायासाठी बँकेत गहाण ठेवल्याचे तिला सांगण्यात आले. सरपंच असलेल्या सासूचा सामाजिक दबदबा आणि दिखाऊ प्रतिष्ठा टिकवण्यासाठी दीप्तीकडून वारंवार पैशांची मागणी केली जात होती. पैशांच्या हव्यासापोटी एका हसत्या-खेळत्या तरुणीचे आयुष्य उद्ध्वस्त करण्यात आले.
या प्रकरणातील सर्वात धक्कादायक आणि क्रूर बाब म्हणजे दीप्तीवर करण्यात आलेला जबरदस्तीचा गर्भपात. पहिली मुलगी झाल्यानंतर सासरच्यांची नाराजी वाढली होती. दुसऱ्या गर्भधारणेदरम्यान ‘वंशाचा दिवा हवा’ या अंधश्रद्धेतून तिची बेकायदेशीर गर्भलिंग तपासणी करण्यात आली. गर्भात मुलगी असल्याचे समजताच, तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने गर्भपात करण्यात आला. एका मातेच्या भावना, शारीरिक आणि मानसिक आरोग्य यांचा कोणताही विचार न करता सासरच्यांनी हे अमानवी पाऊल उचलले.
अखेर शारीरिक, मानसिक आणि सामाजिक छळाची सीमा ओलांडल्याने दीप्तीने तीन वर्षांच्या चिमुकल्या मुलीसमोरच आयुष्य संपवले. या प्रकरणी उरुळी कांचन पोलिसांनी पती रोहन चौधरी, सासू सुनीता (सरपंच), सासरे कारभारी (शिक्षक) आणि दीर रोहित यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमान्वये गंभीर गुन्हा दाखल केला आहे. चारही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.