पुणे-गुवाहाटी इंडिगो विमानाच्या स्वच्छतागृहात ‘बॉम्ब’ असे लिहिलेली एक कागदी चिठ्ठी आढळली, त्यामुळे शुक्रवारी सकाळी पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोलीस आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना तातडीने कारवाई करावी लागली. मात्र, सुरक्षा तपासणीत कोणताही बॉम्ब न सापडल्याने तो संदेश नंतर खोटा असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे विमानाला दोन तासांचा विलंब झाला, असे पोलिसांनी सांगितले.
या घटनेनंतर, मिळालेल्या माहितीनुसार, इंडिगो विमान कंपनीचे सहायक सुरक्षा प्रमुख विशालकुमार श्रीवास्तव यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. इंडिगो कंपनीचे पुणे ते गुवाहाटी हे विमान 29 मे रोजी सकाळी 7 वाजता आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेणार होते. प्रवासी विमानातील एअरहोस्टेसला लेव्हीटरीमध्ये पांढऱ्या रंगाच्या पेपरच्या तुकड्यावर 'बॉम्ब' असे लिहिलेली चिठ्ठी सापडली.
त्यानंतर, कागदाच्या तुकड्यावर बॉम्ब असा धमकीचा संदेश लिहून प्रवाशांची सुरक्षा धोक्यात आणून भीतीचे वातावरण निर्माण केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला आहे.
सुरक्षा यंत्रणांनी तपास केला असता कोणतीही बॉम्ब सदृश्य वस्तू अथवा स्फोटक पदार्थ सापडला नाही. सर्व तपासणी झाल्यानंतर विमान गुवाहाटी दिशेने निघाले. अधिक तपास विमानतळ पोलीस करत आहेत.
विमानातील एअरहोस्टेसने मिळालेली ही चिठ्ठी लीड केबीन क्रू यांच्या ताब्यात दिली. पहाटे 6 वाजून 44 मिनिटांनी याची माहिती सुरक्षा विभागाला दिल्यानंतर प्रवाशांना खाली उतरविण्यात आले. तसेच कंपनीच्या अभियंत्यांनी विमान आयसोलेशनला नेले. पोलिसांनी आणि विमानतळ सुरक्षा कर्मचाऱ्यांनी विमानाची कसून तपासणी केली, परंतु काहीही संशयास्पद आढळले नाही.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.