पुण्यातील गुन्हेगारीच्या घटनांनी पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. वारजे परिसरातील चैतन्य चौकात एका सलूनमध्ये गोळीबाराची थरारक घटना घडली असून, या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. भरवस्तीत झालेल्या या गोळीबारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
काल संध्याकाळी पावणे सातच्या सुमारास चैतन्य चौकातील एका सलूनमध्ये निहाल शिंदे नावाचा तरुण केस कापत होता. त्याचवेळी अचानक पाच आरोपी तिथे आले आणि त्यांनी निहालवर गोळीबार केला. ही गोळी निहालच्या डाव्या कानाला लागल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. या हल्लेखोरांशी झालेल्या झटापटीत अमोल आढाव ही दुसरी व्यक्ती देखील जखमी झाली असून दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनेच्या वेळी वारजे पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक परिसरात गस्त घालत होते. गोळीबाराचा आवाज ऐकताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि साहिल राऊत नावाच्या एका आरोपीला रंगेहात पकडले. पोलिसांच्या या तत्परतेमुळे पुढील मोठा अनर्थ टळला असून इतर चार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
प्राथमिक तपासात हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाल्याचे समोर आले आहे. जानेवारी 2023 मध्ये घडलेल्या एका गुन्ह्याशी या वादाचे धागेदोरे जोडले गेले आहेत. त्या जुन्या वादाचा बदला घेण्यासाठीच निहाल शिंदेवर हा गोळीबार करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.