सध्या राज्यात गुन्ह्यांच्या प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. खून, दरोडे, हुंडाबळी असे अनेक प्रकार घडताना दिसत आहेत. अशातच आता पुणे शहरातून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. शहरातील अनैतिक मानवी वाहतूक व वेश्याव्यवसायाविरोधात मोठी कारवाई करत गुन्हे शाखेच्या पथकाने नऱ्हे गाव परिसरातील एका लॉजवर छापा टाकत 4 महिलांची सुटका केली असून 3 पुरुष आरोपींना अटक केली आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंध कक्ष, गुन्हे शाखा पुणे शहर यांना गुप्त माहिती मिळाली होती की नऱ्हे गाव येथील 'स्वर्ग एक्झिक्युटिव्ह पॅराडाईज लॉज' येथे महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात आहे. या माहितीची खात्री करून पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या मदतीने सापळा रचला. यानंतर पोलिसांनी संबंधित लॉजवर अचानक छापा टाकत कारवाई केली. या कारवाईत वेश्याव्यवसायासाठी आणलेल्या 4 पीडित महिलांची सुटका करण्यात आली.
या प्रकरणी पोलिसांनी अभिषेक दिलीप गवळी (वय24, रा. खेड शिवापूर), रामू सांडू देवकर (वय 24, रा. सिंहगड रोड, पुणे) आणि महेश गणेश नागने (वय 34, रा. न-हे गाव, पुणे) या तिघांना अटक केली आहे. या तिघांवर अनैतिक मानवी वाहतूक (प्रतिबंध) अधिनियम 1956 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित गुन्हा नऱ्हे पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.