Nitin Gadkari: पुणे ते छत्रपती संभाजीनगर सहा तासांचा प्रवास आता दोन तासांत, गडकरींचा मेगाप्रोजेक्ट जाहीर

हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर दोन्ही शहरांतील प्रवास अवघ्या दोन तासांत शक्य होणार असून, राज्याच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे.
Nitin Gadkari: पुणे ते छत्रपती संभाजीनगर सहा तासांचा प्रवास आता दोन तासांत, गडकरींचा मेगाप्रोजेक्ट जाहीर

नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी राज्याच्या दळणवळण क्षेत्रात मोठा बदल घडवणारी महत्त्वाची घोषणा केली. पुणे आणि छत्रपती संभाजीनगर या दोन प्रमुख शहरांना जोडणारा नवीन एक्स्प्रेस हायवे उभारण्यात येणार असून, या प्रकल्पामुळे दोन्ही शहरांमधील प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होणार आहे. नितीन गडकरी यांनी सांगितले की, पुणे ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान नवीन महामार्गासाठी सुमारे 16 हजार 318 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर सध्या सहा ते साडेसहा तास लागणारा प्रवास अवघ्या दोन तासांत पूर्ण करता येणार आहे.

या प्रकल्पासाठी आवश्यक करार पूर्ण झाला असून, प्रत्यक्ष कामासाठी आवश्यक तयारी अंतिम टप्प्यात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या प्रकल्पांतर्गत दोन प्रमुख मार्ग विकसित करण्यात येणार आहेत. पहिला मार्ग पुणे, अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर असा असणार असून, या रस्त्याचे संपूर्ण मजबुतीकरण केले जाईल. काही ठिकाणी नवीन पूल उभारण्यात येणार असून, यासाठी सुमारे दोन हजार कोटींचा अतिरिक्त खर्च केला जाणार आहे. हा मार्ग आधी सुधारून सुरक्षित आणि वेगवान प्रवासासाठी सज्ज केला जाणार आहे.

हेही वाचा: Lionel Messi: कोलकात्यात मेस्सी दौऱ्यादरम्यान चाहत्यांचा मोठा गोंधळ; खुर्च्या आणि पाण्याच्या बाटल्या फेकल्या

दुसरा मार्ग शिक्रापूर येथून सुरू होऊन अहिल्यानगरच्या बाहेरून थेट बीड जिल्ह्यात प्रवेश करेल आणि तेथून छत्रपती संभाजीनगरला जोडला जाईल. हा पूर्णपणे ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस हायवे असणार आहे. या मार्गासाठीची बहुतांश प्रक्रिया पूर्ण झाली असून, एका टोल स्थानकासंदर्भातील निर्णय प्रलंबित आहे. हा निर्णय झाल्यानंतर पुढील दोन ते तीन वर्षांत प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम सुरू होणार असल्याची माहिती गडकरी यांनी दिली.

हा एक्स्प्रेस हायवे पूर्ण झाल्यानंतर केवळ पुणे ते छत्रपती संभाजीनगरच नव्हे, तर छत्रपती संभाजीनगर ते नागपूर हे अंतरही अवघ्या अडीच तासांत पार करता येणार आहे. एकूणच हा महामार्ग पुणे ते नागपूर असा सलग वेगवान मार्ग ठरणार असून, राज्यातील आर्थिक, औद्योगिक आणि पर्यटन विकासाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.

याशिवाय यावर्षी राज्यात अनेक रस्ते प्रकल्पांना मंजुरी देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. निवडणुका संपल्यानंतर विविध महामार्गांचे भूमिपूजन केले जाणार असून, पुणे परिसरात मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांची कामे हाती घेतली जातील. आगामी काळात महाराष्ट्रात सव्वा लाख कोटींपेक्षा अधिक किमतीची रस्ते विकास कामे केली जाणार असल्याचेही नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले. 

हेही वाचा: Anmol Bishnoi Custody : गँगस्टर अनमोल बिश्नोईचा ताबा कोणत्या एजन्सीला मिळणार?; गृह मंत्रालयाचा निर्णय आला समोर

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version