प्रमोद कांबळेंना मानसिक धक्का, शिल्पकाराचा खजिना आगीत भस्मसात

प्रमोद कांबळेंना मानसिक धक्का, शिल्पकाराचा खजिना आगीत भस्मसात

जय महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर

प्रमोद कांबळेंच्या स्टुडिओला लागलेल्या आगीत मोठी कलासंपदा जळून खाक झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून त्याबाबतची हळहळ व्यक्त झाली. पण त्यापुढे जाऊन ज्येष्ठ कलाकारांनी प्रमोद कांबळेंच्या स्टुडिओची नव्यानं निर्मिती करण्यासाठी मदतीचा हात पुढे करण्याचं आवाहन केलं.

रविवारी (काल) 1 वाजण्याच्या सुमारास अहमदनगरमधील त्यांच्या स्टुडिओला आग लागली. ज्यात त्यांनी घडवलेल्या अनमोल शिल्पं, चित्रं, कलाकृती अशा बऱ्याच वस्तू जळून खाक झाल्या. 20 वर्षांची मेहनत अवघ्या काही वेळातच जळून खाक झाली.

साठीच्या दशकात ए. ए. आलमेलकरांच्या स्टुडिओला लागलेल्या आगीनंतर त्यांना मुकुंदराव किर्लोस्करांनी दिलेल्या सल्ल्याचीही आठवण प्रसिद्ध चित्रकार सुहास बहुळकरांनी करुन दिली. प्रमोद कांबळे हे फक्त कलाकार नाहीत, ते कलेचं चालतंबोलतं विद्यापीठ आहे. त्यांच्याकडे बऱ्याच कलाकारांनी धडे गिरवले. शेकडो पुस्तकं, जर्नल्स अशी ज्ञानसंपदाही खाक झाली.

गेल्या 10 ते 12 वर्षापासून प्रमोद कांबळे एमआयडीसीतील त्यांच्या स्टुडिओत काम करायचे. देवदेवतांची शिल्पं, प्राण्यांच्या मोठमोठ्या कलाकृती, दिग्गजांची रेखाटलेली चित्रं, अनेक मान-सन्मान आणि पुरस्कार अशा हिरामाणकांपेक्षा मौल्यवान चीजवस्तूंनी ही जागा समृद्ध होती. त्यामुळे तेच सौंदर्य आणि श्रीमंती परत आणण्यासाठी आता मोठ्या आर्थिक ताकदीची गरज आहे.

निसर्ग किंवा देव या सृष्टीचा निर्माता आहे, असं म्हणतात. तशी ताकद फक्त कलाकारात असते. तोच देवानं घडवलेली दुनिया हुबेहूब साकारु शकतो. त्यामुळे कांबळेंच्या बेचिराख स्वप्नांचं वर्तमान वेदनेचं आभाळ होऊन त्यांच्या डोक्यावर उभं आहे. ज्याची भरपाई फक्त नव्या निर्मितीनंच शक्य आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version