मुंबई: मराठी मनोरंजन विश्वातील सध्याचे सर्वात चर्चेतले जोडपे म्हणजे सोहम बांदेकर आणि पूजा बिरारी. अभिनेते आदेश बांदेकर यांच्या घरी सून म्हणून पाऊल ठेवल्यापासून पूजा बिरारी सातत्याने चर्चेत आहे. सोहम-पूजाच्या शाही विवाहसोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओ अजूनही चाहत्यांच्या मनात घर करून आहेत. पण, खऱ्या आयुष्यातील हा 'वेडिंग फीव्हर' ओसरतो ना ओसरतो, तोच पूजा पुन्हा एकदा लग्नाच्या मांडवात दिसणार आहे!
पूजा बिरारीची लगीनघाई सध्या संपण्याचे नाव घेत नाहीये. खऱ्या आयुष्यात बांदेकरांची सून झाल्यानंतर आता स्टार प्रवाहवरील ‘येड लागलं प्रेमाचं’ या लोकप्रिय मालिकेत पूजा ऊर्फ सर्वांची लाडकी 'मंजिरी' बोहल्यावर चढण्यासाठी सज्ज झाली आहे. राया आणि मंजिरीच्या प्रेमकथेने आधीच प्रेक्षकांना वेड लावले आहे, आणि आता त्यांच्या विवाहाचा सुवर्णक्षण जवळ आला आहे.
सोशल मीडियावर सध्या मंजिरीच्या 'वेडिंग लूक'ची तुफान चर्चा रंगली आहे. पारंपारिक गुलाबी रंगाची नववारी साडी, नाकात नथ, कपाळावर चंद्रकोर आणि गळ्यात ठसठशीत दागिने… अशा रुपात सजलेली पूजा एखाद्या अप्सरेसारखी दिसत आहे. खऱ्या आयुष्यातील लग्नानंतर लगेचच मालिकेतील या लग्नासाठी झालेला तिचा हा शृंगार चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवणारा ठरत आहे.
दुसरीकडे, आपला रायादेखील काही कमी नाही! पांढरा शुभ्र कुर्ता, त्यावर गुलाबी रंगाचा भरजरी शेला आणि डोक्यावर रुबाबदार फेटा बांधून राया लग्नासाठी सज्ज झाला आहे. राया-मंजिरीची ही जोडी 'मेड फॉर ईच अदर' वाटत असून, मालिकेत येणारे हे वळण प्रेक्षकांसाठी मोठी पर्वणी ठरणार आहे.
अनेक अडचणी आणि संघर्षांनंतर अखेर राया-मंजिरीचे प्रेम लग्नाच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे हा सोहळा निर्विघ्नपणे पार पडणार का? की पुन्हा काही नाट्य घडणार? हे पाहण्यासाठी रसिक प्रेक्षकांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.