Crime News : लूटमार, सोलर वायर चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; चार आरोपींना बेड्या, तब्बल 17 लाखांचा मुद्देमाल जप्त

Crime News : लूटमार, सोलर वायर चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; चार आरोपींना बेड्या, तब्बल 17 लाखांचा मुद्देमाल जप्त

विजय चिडे, प्रतिनिधी 

छत्रपती संभाजीनगर : तब्बल सहा जिल्ह्यांत सोलर ऊर्जा प्रकल्पांना लक्ष्य करून लूटमार व सोलर वायर चोरी करणाऱ्या सराईत टोळीचा छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत मुख्य सूत्रधारासह चार जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून सुमारे 17 लाख 8 हजार 240 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 मार्च 2026 रोजी मध्यरात्री पाचोड येथील सब-स्टेशनवर अज्ञात चोरट्यांनी धाड टाकून सोलर प्रकल्पातील साहित्याची तोडफोड करत सुमारे 1 लाख 10 हजार रुपयांची तांब्याची वायर चोरी केली होती. याप्रकरणी सोलर टेक्निशियन भाऊसाहेब लहू पवार यांच्या फिर्यादीवरून पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पवन उर्फ छन्नू महादेव काळे (रा. खामकरवाडी) हा या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी गनिमी कावा वापरत शुक्रवार, 13 मार्च रोजी खामकरवाडी येथे सापळा रचून पवन काळे याला ताब्यात घेतले. चौकशीत पवन काळे याने गुन्ह्याची कबुली देत आपल्या साथीदारांची नावे सांगितली. त्यानुसार सुनिल बापू तपकिरे (रा. भोसा), तवाब नवाब खान (माल विकत घेणारा) आणि ईश्वर पांडुरंग गवळी (गाडीचा मालक) यांना अटक करण्यात आली.

हेही वाचा : PM Surya Ghar Yojana : महाराष्ट्र पुन्हा अव्वल! पंतप्रधान सूर्य घर योजनेत घेतली आघाडी; मुख्यमंत्र्यांनी शेअर केली खास पोस्ट

तपासात ही टोळी छत्रपती संभाजीनगरसह जालना, बीड, धाराशिव, अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यांत सक्रिय असल्याचे उघड झाले. मुख्य आरोपी पवन काळे हा धाराशिव जिल्ह्यातील वाशी व मुरुम पोलीस ठाण्यातील दरोड्याच्या गुन्ह्यांत फरार होता. तसेच धुळे–सोलापूर महामार्गावर रात्री टायर टाकून वाहने लुटण्याच्या घटनांमध्येही त्याचा सहभाग असल्याची माहिती पोलिसांनी दिली.आरोपींकडून विना क्रमांकाची स्कॉर्पिओ गाडी, मोबाईल फोन, चोरीची तांब्याची वायर आणि रोख रक्कम असा एकूण 17,08,240 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड आणि अपर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांच्या पथकाने केली. पुढील तपास पाचोड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन पंडित करत आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version