Basketball Player Hitesh Rathi Tragic Death : हरियाणाच्या रोहतक (Rohtak, Haryana) शहरातून एक अत्यंत दुःखद आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. राष्ट्रीय स्तरावर खेळणाऱ्या 16 वर्षीय बास्केटबॉल (Basketball) खेळाडूचा सराव करत असताना अपघाती मृत्यू झाला. हितेश राठी असे या दुर्घटनेत जीव गमावलेल्या खेळाडूचे नाव आहे. या अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओदेखील (CCTV Video) समोर आला आहे, ज्यामुळे घटनेची तीव्रता आणि अपघात ज्या स्थितीत झाला, त्याचे गांभीर्य लक्षात येते.
रोहतकमधील स्थानिक बास्केटबॉल मैदानावर हितेश राठी एकटाच सराव करत असताना हा प्रसंग घडला. माहितीनुसार, हितेश बास्केटबॉलची नेट असलेल्या लोखंडी खांबाला लटकला. त्याच क्षणी हा खांब त्याच्या अंगावर कोसळला. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, बास्केटबॉलच्या जाळीला लटकल्यानंतर खांब हितेशच्या थेट छातीवर आदळला आणि तो खाली जमिनीवर कोसळला. खांबाखाली दबल्यामुळे हितेशला गंभीर दुखापत झाली.
हरियाणा के रोहतक में बास्केटबॉल पोल गिरने से एक खिलाड़ी की मौत हो गई है, जिसका CCTV फुटेज सामने आया है। #HaryanaNews #HaryanaPolice #Rohtak pic.twitter.com/dixJjCLPAl — Prince Singh- RK (@princesinghrk) November 25, 2025
जवळच असलेले इतर खेळाडू तत्काळ मदतीसाठी धावले आणि त्यांनी खांब बाजूला केला. मात्र, हितेशला जबर दुखापत झाली होती आणि उपचारासाठी पुरेसा वेळ मिळेपर्यंत दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरली आणि संपूर्ण क्रीडा विश्वावर शोककळा पसरली आहे.
हेही वाचा – T20 World Cup 2026: “प्रत्येक Final अहमदाबादलाच का?” ‘T20 World Cup’ निर्णयावरून आदित्य ठाकरे संतापले
या दुर्घटनेनंतर हरियाणा ऑलिम्पिक असोसिएशनने (Haryana Olympic Association) राज्यातील सर्व क्रीडा महोत्सव आणि कार्यक्रम पुढील 3 दिवसांसाठी स्थगित करण्याची घोषणा केली आहे. तसेच, संबंधित अधिकाऱ्यांनी आता तातडीने बास्केटबॉल मैदानांची तपासणी सुरू केली आहे. मैदानातील उपकरणे, त्यांची सध्याची स्थिती आणि खेळाडूंच्या सुरक्षेबाबत आढावा घेतला जात आहे.
विशेष म्हणजे, हितेश राठीच्या अपघाताच्या अवघ्या 2 दिवसांपूर्वी, हरियाणामधील बहादूरगड येथील होशियार सिंह स्टेडियममध्ये आणखी एक 15 वर्षीय खेळाडू अमनचा अशाच अपघातात मृत्यू झाला होता. अमन दुपारी सरावासाठी आला असताना बॉस्केटबॉलचा खांब त्याच्या अंगावर पडला. अमनला तातडीने रोहतक येथील रुग्णालयात दाखल केले होते, पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता. अशा लागोपाठ घडलेल्या घटनांमुळे मैदानातील सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.