PAT Exam Paper Leak: परीक्षेआधीच पेपर सोशल मिडियावर लीक, ‘पॅट-3’ च्या महत्त्वाच्या प्रश्नपत्रिका व्हायरल

परीक्षेची प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
PAT Exam Paper Leak: परीक्षेआधीच पेपर सोशल मिडियावर लीक, ‘पॅट-3’ च्या महत्त्वाच्या प्रश्नपत्रिका व्हायरल

शालेय विद्यार्थ्यांसाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडून घेण्यात येणाऱ्या नियतकालिक मूल्यांकन चाचणी (पॅट ३) परीक्षेची प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात यूट्यूबवरील सहा चॅनेलविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण संस्थेच्या डॉ. मनीषा ताठे यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

विद्यार्थ्यांची शैक्षणिक क्षमता, गणित, इंग्रजी, मराठी विषयातील कल जाणून घेण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडून पॅट 3 ही परीक्षा घेण्यात येते. 11 एप्रिल रोजी मराठी भाषेचा संकलित चाचणी प्रश्नपत्रिका क्रमांक एक, 15 एप्रिल रोजी गणित विषय संकलित चाचणी प्रश्नपत्रिका 2,22 एप्रिल रोजी इंग्रजी विषय प्रश्नपत्रिका 3 या विषयांची परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. प्रश्नपत्रिका महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परिषदेकडून तयार करण्यात येते.

पुण्यातील एका खासगी मुद्रणालयातून प्रश्नपत्रिकांची छपाई केली जाते. प्रश्नपत्रिका छापल्यानंतर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात वितरण करण्यात येते. ही प्रक्रिया गोपनीय असते. मात्र, परीक्षा होण्यापूर्वीच सहा चॅनेलवर मराठी, इंग्रजी, गणित या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका प्रसारित झाल्याचे उघडकीस आले. पोलिसांकडून सोशल मीडियावर प्रश्नपत्रिका प्रसिद्ध कशी करण्यात आली, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण घोडके पुढील तपास करीत आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version