Bhiklya Ladkya Dhinda : पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील वाळवंडा या अतिदुर्गम भागात राहणाऱ्या 92 वर्षांच्या भिकल्या लाडक्या धिंडा यांची 'पद्मश्री' पुरस्कारासाठी झालेली निवड ही संपूर्ण आदिवासी समाजासाठी अभिमानाची गोष्ट ठरली आहे. वयाच्या अवघ्या 10 व्या वर्षापासून जेव्हा ते जंगलात गुरे चरण्यासाठी जात, तेव्हापासून त्यांचा हा सांगीतिक प्रवास सुरू झाला. हातातील काठी आणि सोबतीला पारंपरिक 'तारपा' वाद्य घेऊन ते तासनतास सराव करायचे. आज 80 पेक्षा जास्त वर्षे उलटली तरी, तारप्याच्या सुरांवरील त्यांची पकड आजही तितकीच घट्ट आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने या 'अनसंग हिरो'च्या कार्याची दखल घेत त्यांना सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर केला आहे.
जंगलातील गुरेढोरे आणि तारप्याची साथ, दीडशे वर्षांची कौटुंबिक परंपरा
भिकल्या धिंडा यांच्या घराण्यात तारपा वादनाचा वारसा गेल्या साधारण 150 वर्षांपासून जपला जात आहे. त्यांचे आजोबा नवसू धाकल्या धिंडा आणि वडील लाडक्या धाकल्या धिंडा हे देखील उत्कृष्ट तारपा वादक होते. हाच वारसा भिकल्या यांनी केवळ जपला नाही, तर तो सातासमुद्रापार पोहोचवला. औपचारिक शिक्षण नसतानाही केवळ कलेवरच्या निष्ठेपोटी त्यांनी तारपा हे वाद्य जागतिक नकाशावर नेले. वयाच्या 12 व्या वर्षापासून सुरू झालेली ही ओढ आज 92 व्या वर्षीही तितकीच तरुण आहे. या पुरस्कारामुळे त्यांच्या कुटुंबीयांसह संपूर्ण पालघर जिल्ह्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
'तारपा' हेच आमचे दैवत
"तारपा हेच माझे दैवत आहे," असे भिकल्या धिंडा अत्यंत अभिमानाने सांगतात. आदिवासी संस्कृतीमध्ये तारपा नृत्याला आणि वाद्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आतापर्यंत त्यांना शेकडो स्थानिक आणि राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे, मात्र 'पद्मश्री' हा त्यांच्या आयुष्यातील सर्वोच्च बहुमान ठरला आहे. ही परंपरा केवळ आपल्यापुरती मर्यादित न राहता येणाऱ्या पिढ्यांनीही हिरिरीने जपली पाहिजे, असे भावनिक आवाहन त्यांनी या निमित्ताने केले आहे. वयोमानानुसार शरीर थकले असले, तरी तारपा फुंकताना त्यांच्यात येणारा उत्साह आजही थक्क करणारा आहे.
महाराष्ट्राच्या मानबिंदूंचा गौरव
यंदाच्या पद्म पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांतील रत्नांचा गौरव झाला आहे. भिकल्या धिंडा यांच्यासोबतच अहमदनगरचे तमाशा सम्राट रघुवीर खेडकर आणि परभणीचे प्रगतशील शेतकरी श्रीरंग लाड यांचाही सन्मान करण्यात आला आहे. दुर्गम भागातील कलेला जेव्हा दिल्लीच्या तख्ताकडून सन्मान मिळतो, तेव्हा ती कला खऱ्या अर्थाने अमर होते, याची प्रचिती या पुरस्कारांच्या यादीतून येते. लवकरच राष्ट्रपती भवनात आयोजित विशेष सोहळ्यात भिकल्या धिंडा यांना हा 'पद्मश्री' प्रदान करून गौरविण्यात येईल.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.