मुंबई:मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आता 'अमराठी महापौर' या मुद्द्यावरून राजकीय आखाडा चांगलाच तापला आहे. भाजप नेते कृपाशंकर सिंह यांनी "यंदा मुंबईचा महापौर हिंदी भाषिक उत्तर भारतीय असेल" अशी बतावणी केल्यानंतर, शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जळजळीत शब्दांत हल्ला चढवला आहे. "हा केवळ योगायोग नसून भाजपचा जाणूनबुजून रचलेला कट आहे," अशा शब्दांत राऊतांनी भाजपच्या रणनीतीवर तोफ डागली आहे.
संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधताना कृपाशंकर सिंह यांना 'भाजपचा बोलका पोपट' असे संबोधले. ते म्हणाले की, "मुंबईत मराठी माणसाचे डोकं फोडण्याचा हा भाजपचा जुनाच डाव आहे. कृपाशंकर सिंह यांच्या तोंडून वदवून घेऊन भाजप केवळ जनतेच्या प्रतिक्रियेची चाचपणी करत आहे. त्यांना केवळ मुंबईतच नाही, तर संपूर्ण राज्यात अमराठी महापौर बसवायचे आहेत." या विधानामुळे येत्या 15 दिवसांत मुंबईच्या प्रचारात भाषिक अस्मितेचा मुद्दा प्रचंड गाजण्याची चिन्हे आहेत.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावरही राऊतांनी गंभीर आरोप केले आहेत. नार्वेकरांनी कुलाब्यात विरोधकांना दमदाटी केल्याचे वृत्त समोर आल्यानंतर राऊत संतापले. "नार्वेकर हे विसरले आहेत की ते विधानसभेचे अध्यक्ष आहेत. ज्या पदाला ठराविक संकेत आणि नियम असतात, त्या पदावर बसलेली व्यक्ती कमळाचे उपरणं घालून प्रचारात सहभागी होते, हे लोकशाहीचे दुर्दैव आहे. राज्याच्या घटनात्मक पदाचा हा अवमान आहे," अशी खरमरीत टीका त्यांनी केली.
महाराष्ट्राच्या निर्मितीच्या लढ्याचा संदर्भ देत राऊतांनी भाजपच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. "संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात भाजपचा दूरदूरपर्यंत संबंध नव्हता. आता केवळ परप्रांतीयांची मते मिळवण्यासाठी ही कारस्थाने रचली जात आहेत. मराठी माणसाच्या तोंडावर पिचकारी मारण्याचे काम कृपाशंकर सिंह यांना देण्यात आले आहे," असा टोलाही त्यांनी लगावला. तसेच, भाजपने काही ठिकाणी मुस्लिम उमेदवार दिल्याच्या मुद्द्यावरून राणेंच्या पुत्रांना आता काय भूमिका घेणार, असा खोचक सवालही त्यांनी विचारला.
या पत्रकार परिषदेत राऊतांनी पैशांच्या गैरव्यवहाराचाही मोठा आरोप केला आहे. "भाजप एबी फॉर्मसोबत पाच कोटी रुपये, तर शिंदे गट 10 कोटी रुपये वाटत आहे," असा खळबळजनक दावा त्यांनी केला. उमेदवारी अर्जावरून सुरू असलेल्या गोंधळावर बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, आमच्या पक्षातील काही लोकांनी अपक्ष अर्ज भरले असले तरी त्यांनी कोणतेही तमाशे केलेले नाहीत आणि अनेकांनी सामंजस्याने आपले अर्ज मागे घेतले आहेत.
एकूणच, संजय राऊत यांच्या या प्रहारामुळे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आता 'मराठी विरुद्ध अमराठी' आणि 'संविधानिक नैतिकता' या मुद्द्यांभोवती फिरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता भाजप या 'शाब्दिक वार'ला कशा प्रकारे उत्तर देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.