गेले बरेच दिवस सुरु असलेल्या बारसू रिफायनरी प्रकल्पावरुन सर्वत्र चांगलाच वाद चिघळलेला पाहायला मिळत आहे. याविषयी उद्धव ठाकरे यांनी बारसूमध्ये ६ मे रोजी सभेचं आयोजन केले होते. परंतु, पोलिसांनी ठाकरेंच्या सभेची परवानगी नाकारली असल्याची माहिती समोर आली आहे.
बारसू रिफायनरीवरुन राजकारण चांगलंच तापलंय. बारसू रिफायनरी प्रकल्पाबाबत अनेक नेत्यांनी वेगवेगळी वक्तव्य मांडल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी बारसूमध्ये सभा आयोजित केली होती. ही सभा ६ मे रोजी बारसूतील रानतळेमध्ये होणार होती. तसेच, रिफायनरी प्रकल्पाविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलकांना भेटण्यासाठी उद्धव ठाकरे बारसू दौरा करणार आहेत. मात्र आता उद्धव ठाकरेंच्या सभेची परवानगी पोलिसांनी नाकारली असून सभेसाठी प्रशासनाकडून नकारघंटा वाजली आहे.
दरम्यान, बारसूत ६ मे रोजी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात महायुतीचा समर्थन मोर्चा निघणार आहे. एकीकडे ठाकरेंच्या सभेला नकार आणि दुसरीकडे महायुतीचा समर्थन मोर्चा हे दोन्ही नेमके काय वळण घेईल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. त्यामुळे, या सर्वांचे पडसाद नेमके काय उमटणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.