देशभरात चर्चेत असलेल्या ‘नीट 2026’ पेपरफुटी प्रकरणात आता पुण्याचे नाव समोर आल्याने खळबळ उडाली आहे. नाशिक पोलिसांनी अटक केलेल्या आरोपी खैरनार याचा एक साथीदार पुण्यात असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून, पुणे पोलिसांकडून त्याचा शोध सुरू करण्यात आला आहे. या घडामोडींमुळे तपासाला नवे वळण मिळाले असून पेपरफुटी रॅकेटचे जाळे महाराष्ट्रातील विविध शहरांपर्यंत पसरल्याचा संशय अधिक गडद झाला आहे. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित संशयित मूळचा अहिल्यानगर जिल्ह्यातील असल्याचे समोर आले आहे. मात्र तो सध्या पुण्यात वास्तव्यास असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. नाशिक पोलिसांनी या संदर्भातील माहिती पुणे पोलिसांना दिल्यानंतर स्थानिक पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यास सुरुवात केली आहे.
वाघोली आणि नगर रोड परिसरात हा संशयित लपून बसल्याची शक्यता तपास यंत्रणांकडून व्यक्त करण्यात येत आहे. मंगळवार दुपारपासून त्याचा मोबाईल बंद असल्यामुळे पोलिसांचा संशय अधिक बळावला आहे. संबंधित व्यक्तीचे मोबाईल लोकेशन, कॉल रेकॉर्ड आणि संपर्कातील व्यक्तींची माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. ‘नीट’सारख्या राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या परीक्षेत पेपरफुटीचे आरोप झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये मोठी नाराजी व्यक्त होत आहे. लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित असलेल्या या प्रकरणात आता आणखी कोणाची नावे समोर येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुणे पोलिसांकडून संबंधित संशयिताचा कसून शोध घेतला जात असून, लवकरच या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.